शहर

फेरफार सिध्द होईपर्यंत ईव्हीएमवर शंका उपस्थित करणे गैर – तज्ज्ञ

मुंबई प्रेस क्लब द बिग डिबेटच्या चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत

मुंबई :

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) बद्दल सर्वच शंका व्यक्त करतात पण त्याच्याशी फेरफार होऊ शकते याविषयी ठोस पुरावा कुठेही उपलब्ध नाही. फेरफार होत असल्याचा दावा करणाऱ्यांनी तो नेमका कोण करतात हे सांगण्याची गरज आहे तोपर्यंत ईव्हीएमवर शंका व्यक्त करणे गैर आहे, असा निष्कर्ष ईव्हीएम लोकशाहीचे संरक्षक की धोका? या चर्चासत्रात काढण्यात आला.

द मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित द बिग डिबेट चर्चासत्रात माधव देशपांडे आणि तीर्थराज सामंत हे आयटी तज्ज्ञ सहभागी झाले होते. यावेळी दोन्ही वक्त्यांनी ईव्हीएमविषयी आपापली मते मांडली. ईव्हीएमची रचना सदोष असल्याची माझी सुरुवातीपासूनची धारणा आहे. ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही हे मान्य आहे पण त्याच्याशी छेडछाड किंवा मतांमध्ये फेरफार होऊ शकते हे मानण्यास वाव आहे. निवडणुकीमध्ये मतदार देत असलेले मत हा डेटा आहे आणि मतदार हा त्याचा मालक आहे. जर मतदाराच्या मनात त्याने दिलेले मत नेमके कुणाकडे जाते याविषयी जर त्याच्या मनात शंका असेल तर ती माहिती निवडणूक आयोगाने द्यावी, असे देशपांडे म्हणाले.

ईव्हीएममध्ये व्हीव्हीपॅट हे सर्वाधिक धोकादायक यंत्र आहे. ते निवडणूक प्रक्रियेत आणल्यापासूनच फेरफार झाल्याच्या तक्रारींना सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोग म्हणते की मतदारांनी दिलेल्या मतांच्या कंट्रोल युनिटमध्ये दोन कॉपी तयार होतात. मतमोजणी प्रक्रियेत नेमकी कोणती मते मोजली जातात, याविषयी मात्र काहीही स्पष्टता नाही. निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळत नाही, पारदर्शकता नसणे ही मेख ईव्हीएमविषयी शंका उपस्थित करते, असेही देशपांडे म्हणाले. जेव्हा काही लपविण्यासारखे असते तेव्हाच उत्तरे दिली जात नाहीत.
दरम्यान, याला उत्तर देताना तीर्थराज सामंत म्हणाले की, ईव्हीएमची रचना करताना हजारो तंत्रज्ञ एकत्र येतात. त्याचे प्रोग्रॅमिंग, कोडींग करण्यात ते सहभागी होतात. एखाद्या उमेदवाराला मते वाढवून द्यायची असे ठरवले तरी त्यासाठी वेगळे कोडींग बनवावे लागेल, त्यासाठी तंत्रज्ञाला कारण द्यावे लागते. ईव्हीएमध्येच फेरफार होतो असे म्हणणे म्हणजे त्यात हजारो व्यक्तींचा सहभाग आहे, असा दावा करणे आहे. एका राज्यात लाखो ईव्हीएम मशीन असतात, त्यात फेरफार करण्यासाठी फार मोठी फौज लागेल आणि हे करणे निव्वळ अशक्य आहे, असेही ते म्हणाले.

ईव्हीएममध्ये फेरफार होतो असे म्हणणारे कोणताही सबळ पुरावा देत नाहीत, उलट ते असा फेरफार होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करतात. अशी शक्यता व्यक्त करणारे उद्या मशीनमध्ये बॉम्ब बसविणे शक्य आहे असेही म्हणू शकतात. ईव्हीएम सुरक्षित आहेत असे माननण्यासाठी त्याचे सर्किट आणि कोडींग सार्वजनिक करा असे म्हणतात, परंतु, देशात काही बाबी राष्ट्रीय गुपिते असतात. त्यामुळे अशी मागणी करणे हास्यास्पद आहे, असेही सामंत म्हणाले.

मतदाराला मत जाणून घेण्याचा हक्क – दिग्विजय सिंह
चर्चासत्राला मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह उपस्थित होते. ते म्हणाले लोकशाहीत मतदाराला त्याने मत कोणाला दिले हे जाणून घेण्याचा हक्क आहे. मी कुणाला मत दिले, ते कुणाला गेले आणि ते योग्य रितीने मोजले गेले आहे का हे माहिती करुन घेण्याचा हक्क आहे. मतदाराला व्हीव्हीपॅटची पावती मिळावी जी घेऊन तो बॅलेट बॉक्समध्ये टाकेल. त्यानंतर या पावत्याही मोजल्या तर मतदारांचा मतदानावर विश्वास वाढेल, असे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *