नवी दिल्ली :
महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या दहा सदस्यांची खो-खो महासंघाने (KKFI) पहिल्या खो-खो विश्वचषकासाठी आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी (ITO) म्हणून निवड केली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १३ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर होणार आहे.
भारतीय खो-खो महासंघाने अधिकृत पत्राद्वारे महाराष्ट्र संघटनेला ही माहिती कळवली. या निवडीमुळे महाराष्ट्रातील खेळाडू व अधिकाऱ्यांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे महासचिव प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी सांगितले.
निवड झालेल्या तांत्रिक अधिकाऱ्यांची नावे :
प्रा. डॉ. चंद्रजित जाधव (स्पर्धा व्यवस्थापक/ आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी)
प्रशांत पाटणकर (सह-आयोजक/ आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी)
सचिन गोडबोले, गोविंद शर्मा, संदीप तावडे, सुरेंदर विश्वकर्मा, किरण वाघ, रफीक शेख, किशोर पाटील, आणि संदेश आम्रे (आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी).
गोवा : अखिल गोवा खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष लिमा लुईस यांची सुध्दा (आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी) म्हणून निवड झाली आहे. त्यांनी या आधी सुध्दा ढाका, बांगला देश येथे झालेल्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पंच म्हणून काम पहिले आहे.
गौरवास्पद घटना:
महाराष्ट्राच्या खो-खो अधिकाऱ्यांची जागतिक स्तरावर निवड ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. खो-खो खेळाची जागतिक लोकप्रियता वाढत असल्याचा हा स्पष्ट पुरावा आहे.
भारतीय खो-खो महासंघाच्या महासचिवांचे आवाहन
भारतीय खो-खो महासंघाचे महासचिव एम. एस. त्यागी यांनी महाराष्ट्र संघटनेला निवड झालेल्या अधिकाऱ्यांना ११ ते २० जानेवारी २०२५ दरम्यान दिल्ली येथे पाठवण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून हे अधिकारी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान देऊ शकतील. महाराष्ट्र खो-खो संघटनेसाठी ही निवड म्हणजे खेळाच्या वाढत्या ग्लोबल मान्यतेचे प्रतीक आहे आणि भविष्यातील खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरेल.