आरोग्य

गर्भनिरोधक तांबीकडे दुर्लक्ष केल्याने वेदनेने महिला हैराण; सेंट जॉर्जेस रुग्णालयातील डॉक्टरांनी केली त्रासातून सुटका

मुंबई :

पहिल्या अपत्यानंतर गर्भधारणा टाळण्यासाठी अनेकदा महिला कॉपर – टी (तांबी) बसवितात. तांबी सुरक्षित असली तरी त्याकडे दुर्लक्ष केल्यास ते घातक ठरू शकते. याचा प्रत्यय सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल रुग्णाला आला आहे. प्रसूतीनंतर गर्भाशयाच्या मुखावर बसवलेल्या तांबीकडे दुर्लक्ष केल्याने ती गर्भाशयातून पुढे सरकून थेट मूत्राशयाच्या पिशवीपर्यंत पोहचली होती. त्यामुळे मूत्राशयाच्या पिशवीमध्ये पू तयार होऊन संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेत तिची त्रासातून मुक्तता केली.

दिवा येथे राहणारी वैदेही घाणेकर (२७) ही एका खासगी रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून कार्यरत आहे. जानेवारी २०२४ मध्ये तिची एका सरकारी रुग्णालयात प्रसूती झाली. प्रसूतीनंतर तिने व तिच्या पतीने पुढील गर्भधारणा टाळण्यासाठी तांबी बसविण्याचा निर्णय घेतला. तांबी बसविल्यानंतर १० ते १२ दिवसांनी तिला न्यूमोनिया आणि पित्ताशयातील खड्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिने खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले. मात्र उपचारांचा खर्च परवडत नसल्याने ती सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली. पण फारसा फरक पडला नाही. तिथे काढलेले एक्स-रे, सोनोग्राफी आणि अन्य तपासण्यांचे अहवाल ती कामाला असलेल्या कल्याणमधील खासगी रुग्णालयातील आपल्या सहकार्यांना पाठवून त्यांचा सल्ला घेत होती. काही दिवसांत त्रास कमी झाल्याने तिने दैनंदिन कामाला प्राधान्य दिले. थोड्या दिवसाने तिला पुन्हा त्रास होऊ लागल्याने तिने ती काम करत असलेल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू केले. यावेळी तेथील डॉक्टरांनी तिला तांबी काढण्याचा सल्ला दिला होता. परंतु त्रास कमी झाल्यावर तिने त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान तिच्या वडिलांना यकृताचा त्रास असल्याने डिसेंबरमध्ये त्यांना सेंट जॉर्जेस रुग्णालयात  उपचारासाठी घेऊन आली. त्याचदरम्यान तिला पुन्हा त्रास होऊ लागल्याने तिने रुग्णालयातील  स्त्री रोग विभागाच्या प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. राजश्री कटके यांना दाखवले. त्यांनी तिची तपासणी करून सोनोग्राफी केली. त्यामध्ये तिची तांबी गर्भाशयाच्या पिशवीपासून आतमध्ये सरकल्याचे लक्षात आले. तांबी नेमकी कोठे आहे हे पाहण्यासाठी सीटी स्कॅन केल्यावर तांबी गर्भाशयातून मागे सरकून मूत्राशयाच्या पिशवीपर्यंत पोहचल्याचे लक्षात आले. तसेच तांबी अडकलेल्या ठिकाणी पू झाल्याचे आढळून आले. त्यामुळेच तिला वेदना होत होत्या. तांबी अधिक पुढे सरकल्यास मूत्राशयाची पिशवी फाडली जाण्याची शक्यता होती. तसे झाल्यास मूत्राशयाच्या पिशवीतील मूत्र हे शरीरात जाऊन संसर्ग होऊन तिच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २४ डिसेंबर रोजी वैदेहीवर डॉ. राजश्री कटके, शस्त्रक्रिया विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. विनया आंबोरे आणि त्यांच्या तुकडीने यशस्वी शस्त्रक्रिया करत तिच्या मूत्राशयाच्या पिशवीपर्यंत पोहचलेली आणि खराब झालेली तांबी यशस्वीरित्या बाहेर काढली. या शस्त्रक्रियेनंतर वैदेहीला मागील वर्षभरापासून असलेल्या त्रासातून मुक्तता मिळाली. वैदेहीची प्रकृती उत्तम असून तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

सेंट जॉर्जेस रुग्णालयातील डॉक्टरांनी माझ्या वडिलांवर उत्तम उपचार करून, त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले होते. त्यामुळे मी सेंट जॉर्जेस रुग्णालयात उपचार करण्याला प्राधान्य दिले. येथील डॉक्टरांनी माझ्यावर उत्तम उपचार केल्याची माहिती रुग्ण वैदेही घाणेकर हिने दिली.

गर्भाशय पिशवीच्या मुखावर तांबी बसविल्यानंतर तिचा धागा हा बोटाने तपासून पाहायचा असतो. तांबी व्यवस्थित आहे की नाही तपासायचे असते. पाळीदरम्यान कधीकधी तांबी सरकली किंवा पडलेली असेल तर डॉक्टरांना दाखवून सोनोग्राफी करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा महिलांकडून नियमित तपासणी होत नाही. तसेच तांबी बसविल्यानंतर अनेक महिला विसरून जातात. त्यामुळे महिलांना काळजी घेणे आवश्यक आहे.

– डॉ. राजश्री कटके, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, सेंट जॉर्जेस रुग्णालय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *