मुंबई :
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त आज (मंगळवार) ७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृह फोर्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. या दीक्षान्त समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन भूषवणार आहेत. या दीक्षान्त समारंभाला भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय कंरदीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून दीक्षान्तपर भाषण करतील. समारंभाचे सन्माननीय अतिथी म्हणून चंद्रकांत (दादा) पाटील, मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्य, महाराष्ट्र राज्य, मंगलप्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता, महाराष्ट्र राज्य, ॲड. आशिष शेलार, मंत्री, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, इंद्रनील नाईक, राज्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, डॉ. फ्रेड पेस्टेलो, अध्यक्ष, सेंट लुईस विद्यापीठ, सेंट लुईस, मिसोरी राज्य, अमेरिका, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमासाठी अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषदेचे मान्यवर सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता यांच्यासोबत विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित राहणार असल्याचे परीक्षा व मूल्यपामन मंडळाचे संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.
ज्या स्नातकांनी पदव्यांसाठी आणि पदवीकांसाठी स्वतःची पात्रता सिद्ध केलेली आहे त्यांना पदवी प्रदान करण्यासाठी या दीक्षान्त समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या वर्षीच्या दीक्षान्त समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील १ लाख ६४ हजार ४६५ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये ८५ हजार ५११ मुली तर ७८ हजार ९५४ मुलांचा समावेश आहे. यामध्ये पदवीपूर्व स्नातकांची संख्या १ लाख ३९ हजार १८४ एवढी असून पदव्युत्तरसाठी २५ हजार २८१ स्नातकांचा समावेश आहे. पदवीपूर्व स्नातकांमध्ये ७० हजार ५२३ एवढ्या मुलींचा समावेश असून, ६८ हजार ६५२ मुलांचा समावेश आहे. पदव्युत्तर स्नातकांमध्ये १४ हजार ९७९ एवढ्या मुलींचा समावेश असून १० हजार ३०२ एवढ्या मुलांचा समावेश आहे.
विद्याशाखीय पदव्यांनुसार वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा ८६ हजार ६०१, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा ४७ हजार १४, मानव्यविज्ञान विद्याशाखा २२ हजार ५८३ आणि आंतर-विद्याशाखीय अभ्यासशाखेसाठी ८ हजार २६७ एवढ्या स्नातकांचा समावेश आहे.
त्याचबरोबर विविध विद्याशाखेतील ४०१ स्नातकांना विद्यावाचस्पती (पी.एचडी) पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी २३०, वाणिज्य व व्यवस्थापन ८०, मानव्यविज्ञान विद्याशाखेसाठी ५१ आणि आंतर-विद्याशाखीय अभ्यासशाखेसाठी ४० एवढ्या पदव्यांची संख्या आहे.
विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या १८ विद्यार्थ्यांना २० पदके मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात येणार आहेत. यामध्ये १५ मुली व ३ मुलांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबई विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलवर करण्यात येणार आहे.