मुंबई :
सर्व विद्यापीठांनी वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षभराचे शैक्षणिक वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे व त्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या दीक्षान्त समारंभात केल्या. जून महिन्यापर्यंत निकाल जाहीर करून एक महिन्यात दीक्षान्त समारोह आयोजित करावे जेणेकरून विद्यार्थ्यांना पदवी लगेचच मिळेल असेही राज्यपालांनी सांगितले. महाविद्यालये व विद्यापीठ विभागांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे याकडे लक्ष वेधून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या करिता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्ग काढला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून पदवी प्राप्त केल्यानंतर देखील ते आयुष्यभर सुरु असले पाहिजे असे सांगताना विद्यार्थ्यांनी इतरांशी तुलना न करता आपल्या गतीने शिकत राहिले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आरोग्यासाठी व्यायाम व चालणे या सवयी लावून घेतल्या पाहिजे व अंमली पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले. आपल्या स्थापनेचे १६८ वे वर्ष साजरे करीत असलेल्या मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारोह राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. ७) सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृह येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय कंरदीकर हे उपस्थित होते.
समारंभाचे सन्माननीय अतिथी म्हणून चंद्रकांत पाटील, मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्य, महाराष्ट्र राज्य, श्री. मंगलप्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता, महाराष्ट्र राज्य, डॉ. फ्रेड पेस्टेलो, अध्यक्ष, सेंट लुईस विद्यापीठ, सेंट लुईस, मिसोरी राज्य, अमेरिका, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आणि परीक्षा व मूल्यपामन मंडळाचे संचालक डॉ. पूजा रौंदळे यांच्यासह अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषदेचे मान्यवर सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता यांच्यासोबत विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विभागप्रमुख आणि प्राध्यापक समारोहाला उपस्थित होते.
या दीक्षान्त समारंभाला भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय कंरदीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दीक्षान्तपर भाषणात प्रा. अभय करंदीकर यांनी समृद्ध, स्वावलंबी आणि विकसित भारत घडविण्यासाठी विद्यार्थ्यांची नवकल्पना आणि नेतृत्व महत्त्वाचे असेल असे सांगून यासाठी भारतात संशोधन पुरक व्यवस्था निर्माण करण्यात आली असल्याचे सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने, नॅशनल रिसर्च फाउंडेशन आणि अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन ची स्थापना करण्यात आली आहे. यामाध्यमातून भारताच्या संशोधन परिसंस्थेला बळकट करण्यासाठी, सहयोगी प्रयत्नांना सुलभ करण्यासाठी आणि तांत्रिक प्रगतीचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. क्रिप्टोग्राफी आणि हेल्थकेअर यासारख्या क्षेत्रांवर प्रभाव टाकणाऱ्या क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये भारताला जागतिक नेतृत्व म्हणून स्थान देणे शक्य व्हावे यासाठी आपण सध्या नॅशनल मिशन ऑन क्वांटम टेक्नॉलॉजीज आणि ॲप्लिकेशन्स सारख्या उपक्रमांकडे विशेष लक्ष देत असल्याचेही त्यांनी सांगितले. मूलभूत संशोधनासाठी अणुसंधान नेशनल रिसर्च फाऊंडेशन ची स्थापना, खाजगी क्षेत्राच्या संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी ₹ १ लाख कोटींचा निधी आणि अवकाश अर्थव्यवस्थेसाठी ₹ १००० कोटीचा व्हेंचर कॅपिटल फंड हे उद्योग गुंतवणुकीला प्रोत्साहन देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे प्रा. अभय करंदीकर यांनी त्यांच्या दीक्षान्तपर भाषणात, परिवर्तनाच्या अनुषंगाने भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सुसज्ज पदवीधर तयार करून राष्ट्रीय विकासाला चालना देणारी एक सशक्त संशोधन संस्कृती निर्माण करण्यात मुंबई विद्यापीठासारख्या संस्था महत्त्वाच्या भूमिका बजावत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी मिळवलेले ज्ञान आणि कौशल्ये भारताला विज्ञान, तंत्रज्ञान आणि शाश्वततेमध्ये जागतिक नेतृत्वाकडे नेण्यास मदत करतील. नवोन्मेष, संशोधन आणि विकासाने चालत असलेल्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मुंबई विद्यापीठासारखे विद्यापीठ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. भारताची युवाशक्ती ही भारताचे बलस्थान आहे. भारताला एक प्रमुख अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानाने संपन्न करण्याच्या सामर्थ्यामध्ये बदलण्याची गुरुकिल्ली विद्यार्थ्यांकडे असून मोठे स्वप्न पाहून आव्हानांचा स्वीकार करून मार्गक्रमण करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी केले अहवाल वाचन
याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी मुंबई विद्यापीठाचा मागील एक वर्षाचा विकासात्मक अहवाल वाचतांना मुंबई विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत आघाडी घेतली असून, बहुविद्याशीख शिक्षणानुसार दुहेरी, सह आणि ट्विनींग पदवीचे शिक्षणाचे दालन खुले केले असल्याचे सांगितले. विद्यापीठाने संशोधनात घेतलेल्या झेपेमुळे जागतिक तथा आशियाई क्रमवारीत विद्यापीठाचे स्थान अधोरेखित झाले असल्याचे सांगितले. विविध प्राध्यापकांची ११ पेटेंट ( ७ ग्रांटेड आणि ४ फाइल) , पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी अनुदान, सेंटर फॉर एक्सलेंस इन एआय, युडीआआरएफ अंतर्गत गुणवत्ता आणि संशोधनाचे विविध पुरस्कार, युनिव्हर्सिटी एडमिनिस्ट्रॅटिव्ह एक्सलेंस अवार्ड, कार्बन न्यूट्रल ग्रीन कॅम्पस अशी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यापीठात सुरु करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
दीक्षान्त समारंभात प्रदान केलेल्या पदव्यांचा तपशील
या वर्षीच्या दीक्षान्त समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील १ लाख ६४ हजार ४६५ स्नातकांना पदव्या प्रदान आल्या. यामध्ये ८५ हजार ५११ मुली तर ७८ हजार ९५४ मुलांचा समावेश आहे. यामध्ये पदवीपूर्व स्नातकांची संख्या १ लाख ३९ हजार १८४ एवढी असून पदव्युत्तरसाठी २५ हजार २८१ स्नातकांचा समावेश आहे. पदवीपूर्व स्नातकांमध्ये ७० हजार ५२३ एवढ्या मुलींचा समावेश असून, ६८ हजार ६५२ मुलांचा समावेश आहे. पदव्युत्तर स्नातकांमध्ये १४ हजार ९७९ एवढ्या मुलींचा समावेश असून १० हजार ३०२ एवढ्या मुलांचा समावेश आहे. विद्याशाखीय पदव्यांनुसार वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा ८६ हजार ६०१, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा ४७ हजार १४, मानव्यविज्ञान विद्याशाखा २२ हजार ५८३ आणि आंतर-विद्याशाखीय अभ्यासशाखेसाठी ८ हजार २६७ एवढ्या स्नातकांचा समावेश आहे. त्याचबरोबर विविध विद्याशाखेतील ४०१ स्नातकांना विद्यावाचस्पती (पी.एचडी) पदवी प्रदान करण्यात आली. ज्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी २३०, वाणिज्य व व्यवस्थापन ८०, मानव्यविज्ञान विद्याशाखेसाठी ५१ आणि आंतर-विद्याशाखीय अभ्यासशाखेसाठी ४० एवढ्या पदव्यांची संख्या आहे. विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या १८ विद्यार्थ्यांना २० पदके मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आली. यामध्ये १५ मुली व ३ मुलांचा समावेश आहे.