मुंबई :
राज्यातील पथकर वसुली नाक्यांवर १ एप्रिल २०२५ पासून सर्व वाहनांचा पथकर फास्ट-टॅगद्वारेच भरावा लागणार आहे. या नि्र्णयानुसार सद्याच्या सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण २०१४ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
फास्ट टॅगच्या माध्यमातून पथकर वसुली झाल्यास पथकर वसुलीत अधिक सूसुत्रता, पारदर्शकता येणार आहे. पथकर नाक्यांवर वाहनांचा खोळंबा कमी होणार आहे. यातून वेळेची, इंधनाची बचत होणार आहे. त्याचप्रमाणे फास्ट-टॅग शिवाय रोख रक्कम स्मार्ट कार्ड क्रेडिट डेबिट कार्ड किंवा कोड किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे पथकर भरायचा झाल्यास किंवा फास्ट – टॅग सुरु नसेल किंवा टॅगशिवाय वाहनाने फास्ट-टॅगच्या मार्गिकेत प्रवेश केल्यास दुप्पट पथकर भरावा लागणार आहे. १ एप्रिल २०२५ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. या निर्णयामुळे वाहतूक कोंडी टळून इंधनाची आणि वेळेची देखील बचत होणार आहे.
एमएसआरडीसीच्या अखत्यारीत ५० टोलनाके असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यात २३ टोल नाके आहेत. या नाक्यांवर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, तसेच राज्यात सद्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १३ आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ९ रस्ते प्रकल्पांवर पथकर वसुली सुरु आहे. या ठिकाणी तसेच भविष्यात पथकर वसुल करावा लागणाऱ्या प्रकल्पांसाठी हा निर्णय लागू राहणार आहे, अशी माहिती ही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.