मुंबई :
मुंबई विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चा दीक्षांत सोहळा (पदवीदान समारंभ) बुधवारी ७ जानेवारी रोजी राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विद्यापीठाच्या भोंगळ कारभारविरोधात युवासेनेच्या नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाचे सर्व सिनेट सदस्यांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वार येथे काळ्या फित लावून परिपत्रकाची होळी केली.
मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभादरम्यान विद्यापीठातील भोंगळ कारभार राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून देत त्यांच्यासमोर विद्यार्थ्यांची गाऱ्हाणी युवासेनेला मांडायची होती. मात्र कार्यक्रम संपताच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील तातडीने निघून गेले, तसेच विद्यापीठ प्रशासनाने सिनेट सदस्यांना राज्यपाल यांची भेट घेऊ दिली नाही. त्यामुळे सोहळा पार पडल्यावर विद्यापीठाच्या प्रवेशद्वार काळ्या फित लावून निषेध करण्यात आला. तसेच विद्यापीठाने सप्टेंबर महिन्यात विनापरवाना विद्यापीठाच्या कोणत्याही क्षेत्रात आंदोलन करण्यास मज्जाव केला. तसेच आंदोलन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे परिपत्रक जारी केले होते. त्यामुळे या परिपत्रकाची होळी सुद्धा यावेळी करण्यात आली. हे परिपत्रक मागे घेण्याबाबत कुलगुरु तसेच राज्यपाल यांना निवेदन दिले आहे.
एका शैक्षणिक वर्षात दोन वेळा होणारी पेट परीक्षा तब्बल दोन वर्षाने घेण्यात आली. त्यामध्येही अनेक घोळ घालण्यात आले अशा विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांकडे विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने प्रलंबित आहेत. याकडे मुंबई विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा मुख्य सोहळा असल्यामुळे किमान काळ्या फित लावण्यात आल्या होत्या, पण यापुढे विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी यावेळी दिला. यावेळी युवासेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, डॉ.धनराज कोहचाडे, परमात्मा यादव, अल्पेश भोईर, मयुर पांचाळ, किसन सावंत, स्नेहा गवळी तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य मिलिंद साटम, शिवसेना उपनेत्या शितल शेठ देवरुखकर आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर उपस्थित होते.