मुंबई :
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील विद्यार्थीकेंद्री नाविन्यपूर्ण बदलांविषयी आणि त्यांच्या हितकारक परिणामांविषयी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्कूल कनेक्ट २.० अंतर्गत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त लाभला होता. मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर ३६,००४ हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी यामध्ये ९ वी,१० वी, ११ वी, आणि १२ वीमध्ये सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेत कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजावून सांगितले.
शालेय तथा उच्च शिक्षणातील विविध पातळ्या, विविध मेजर आणि मायनरचे संयोजन, विविध सहा व्हर्टिकल्स, शिक्षणातील लवचिकता, मल्टीपल एन्ट्री आणि एक्झिट पर्याय, श्रेयांक हस्तांतरण, ४ वर्षीय पदवी अभ्यासक्रम हे सर्व नावीन्यपूर्ण बदल विद्यार्थी केंद्रस्थानी ठेऊन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. या व्याखानादरम्यान कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलाच्या अनुषंगाने अप्रेंटीशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम( एईडीपी), इंटर्नशिप, भारतीय ज्ञान प्रणाली, स्वयंम, पीएम विद्यालक्ष्मी लोन स्किम, पीएम उच्चतर शिक्षा प्रोत्साहन आणि साथी SATHEE ( सेल्फ-असेसमेंट, टेस्ट अँड हेल्प फॉर एन्ट्रन्स एक्झामिनेशन या उपक्रमांची माहिती दिली.
विद्यार्थी केंद्रीत शिक्षणाची मुलभूत तत्वे परिणामकारीकत्या प्रत्यक्षात आणावयाच्या अनुषंगाने स्कूल कनेक्ट २.० हे उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठाने आघाडी घेत या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांनाही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजून घेण्याची संधी यानिमित्ताने मुंबई विद्यापीठामार्फत उपलब्ध करून देण्यात आली होती.