नवी दिल्ली :
भारताच्या राजधानीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये आजपासून खो-खो विश्वचषक २०२५ ला भव्य सुरुवात होणार आहे. या ऐतिहासिक प्रसंगासाठी २३ देशांतील ३९ संघांनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेत २० पुरुष आणि १९ महिला संघ आपले कौशल्य दाखवणार आहेत. दिल्लीतील वातावरण क्रीडारसिकांच्या उत्साहाने भरले असून, खो-खोचा जल्लोष आजपासून अधिकृतपणे सुरू होणार आहे. दिल्लीत जणू जागतिक क्रीडा महोत्सवाला आज पासून सुरवात झाली असून आज भारताच्या राजधानीत खो-खो चा आवाज घुमणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खो-खोला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या या स्पर्धेसाठी जगभरातील संघांचे दिल्लीत आगमन झाले आहे. पारंपरिक भारतीय क्रीडाप्रकार असलेल्या खो-खोचा आधुनिक ग्लोबल स्वरूप आज या स्पर्धेत पहायला मिळणार आहे.
ज्या कार्यकर्त्यांनी खो-खो साठी आख्खी हयात घालवली आज त्यांना कोण आनंद होत असेल हा विचारच खूप काही सांगून जातो. एक काळ असा होता कि खो-खोचे कीट (बनियन व हाफ पँट) हे मिळवणे व ते अंगावर घालणे यात खूप कष्ट तर होतेच पण त्याचा अभिमान सुध्दा खूप असायचा. काही खेळाडू तर फक्त या कीट साठी खेळायचे. आज खो-खो च रूपड पालटलं आहे. खेळाडूंना भरभरून सुविधा उपलब्ध होत आहेत. आज खेळाडू खेळाडूंवर भरभरून बक्षिसे मिळत आहेत. खेळाडू विमानाने प्रवास करू लागले आहेत. हजारो, लाखो नव्हे तर आता करोडो रुपयांचे बक्षीस मिळवताना खो-खो खेळाडू दिसणार आहेत. एकेकाळी अत्यंत साध्या स्वरूपात खेळला जाणारा हा खेळ आता आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण झाला आहे. यामुळे खो-खो खेळाच्या प्रगतीचा प्रवास हा अनेकांना प्रेरणादायी वाटत आहे.
संघांचे आगमन :
पहिल्यांदा श्रीलंका आणि पेरू हे संघ दिल्लीमध्ये दाखल झाले. ११ जानेवारीला जवळजवळ १४ देशांचे संघ दाखल झाले. तर काल पर्यंत २३ पैकी एखाद दुसरा देश वगळता सर्वच संघ दिल्लीत पोहचल्याचे भारतीय महासंघाचे सहसचिव प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी सांगितले.
आशियाई संघांची जबरदस्त उपस्थिती
आशियाई संघांनी या स्पर्धेत उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे. इराण, मलेशिया, बांगलादेश, इंडोनेशिया, नेपाळ आणि दक्षिण कोरिया हे संघ आपले कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. या देशांमध्ये मध्यंतरीच्या काळात आपल्या देशातून प्रशिक्षक दिले होते व त्या-त्या देशात खो-खो सुरु झाला व आता ते संघ पुरुष आणि महिला गटांमध्ये जोरदार लढत देतील, अशी अपेक्षा आहे.
पाश्चात्त्य देशांची नवी वाटचाल, खो-खो ची मुसंडी
पाश्चात्त्य देशांमध्ये अमेरिका, पोलंड, नेदरलँड्स आणि जर्मनी या देशांचा सहभाग विशेष ठरणार आहे. या देशांमध्ये खो-खो हा खेळ नव्याने सुरु झाला असला तरी त्यांचा सहभाग त्या-त्या देशांमध्ये खो-खो खेळाला सरावाने आपला करू लागले आहेत. याशिवाय, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दक्षिण गोलार्धातील देशही उत्साहात सहभागी झाले आहेत. अर्जेंटिनाचा सहभाग दक्षिण अमेरिकेतील खो-खोला मिळालेली देणगी ठरणार आहे. यापूर्वी भारत व इंग्लंड या देशांनी एकमेकांच्या देशात जाऊन खो-खो स्पर्धा खेळली होती. त्यामुळेच इंग्लंडचा सहभाग या स्पर्धेची प्रतिष्ठा वाढवताना दिसतो.
संघांचे आगमन आणि सराव सत्र :
दिल्लीमध्ये आगमन झालेल्या सर्व संघांचे सराव सत्र सुरू झाले आहेत. त्या-त्या संघांचे प्रशिक्षक या विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्या खेळाडूंच्या रणनीतींवर काम करत आहेत. या सरावाच्या निमित्ताने स्टेडियमच्या परिसरात उत्साह निर्माण झाला आहे.
उद्घाटन सोहळ्यासाठी जय्यत तयारी
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम पारंपरिक भारतीय सजावटीसह विविध देशांच्या रंगांनी नटले आहे. या सोहळ्यात खेळाडूंच्या सांस्कृतिक आदान-प्रदानाची झलक पाहायला मिळणार आहे.