मुंबई :
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करताना विद्यार्थी व पालकांना अनेक अडचणी व समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून टिकीट सिस्टम सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या व अडचणी संकेतस्थळाद्वारे थेट राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाला कळविता येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या शंका व समस्यांचे निरसन करण्यासाठी टोल फ्री क्रमांकाबरोबरच स्वतंत्र हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षांच्या ऑनलाईन अर्जाची नोंदणी प्रक्रिया पोर्टलच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. मात्र सामाईक प्रवेश परीक्षांचे अर्ज भरताना विद्यार्थी व पालकांना येणाऱ्या अडचणीसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये टिकीट सिस्टम ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेनुसार विद्यार्थ्यांच्या लॉगीन आयडीमध्ये ‘टिकिट सिस्टिम’ हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. विद्यार्थांना या पर्यायावर क्लिक करून अर्ज नोंदणी करताना किंवा पुढील प्रवेश प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या समस्या व अडचणी थेट राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे मांडता येणार आहेत. यावर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाला ठरावीक कालावधीत उत्तर देणे अपेक्षित असल्याने विद्यार्थ्यांच्या शंकांचे जलदगतीन निसरन होण्यास मदत होणार आहे.
टिकीट सिस्टिमप्रमाणे विद्यार्थ्यांना शंका व समस्या उपस्थित करण्यासाठी टोल फ्री क्रमांक आणि स्वंतत्र हेल्पलाईन क्रमांक तसेच ई मेल आयडीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून १८००२०९०१९१ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्याबरोबरच ७९६९१३४४०१, ७९६९१३४४०२ हे दोन हेल्पलाईन क्रमांक सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीसाठी सुरू केले आहेत. या क्रमांकावर विद्यार्थी संपर्क साधून आपल्या समस्यांचे निरसन करू शकतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना cethelpdesk@maharashtracet.org या मेल आयडीवर आपल्या शंका विचारू शकतात.
दरम्यान राज्य सामाईक प्रवेश परीक्षांच्या नोंदणी प्रक्रियेकरीता येणाऱ्या अडचणी किंवा शंकासाठी cetcell@mahacet.org या प्रवेश परीक्षा कक्षाच्या ईमेल आयडीवर कोणत्याही प्रकारचा मेल करू नये, अशा सूचनाही राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून विद्यार्थी व पालकांना दिल्या आहेत.