मुंबई :
राज्यातील अनेक बसस्थानके बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्वावर विकसित करण्यात येत आहेत. एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी ‘एस. टी.’च्या प्रकल्पात प्रत्येक जिल्ह्यात २५ तर मुंबईतील बोरिवली येथील जागेवर १०० खाटांचे रूग्णालय सुरू करण्यात येणार आहे. या रूग्णालयात एस. टी. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यात येतील, तसेच पाच लाखांपर्यंतच्या शस्त्रक्रियांचा खर्च राज्यशासन करेल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
सध्या राज्यभरात विविध ठिकाणी बांधा – वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर ‘एसटी’च्या जागांचा विकास केला जात आहे. भविष्यात या रुग्णालयांमध्ये ‘एसटी’ कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येतील. पुणे, कोल्हापूर, पुसद, वाशिम येथे रूग्णालय उभारण्यासंदर्भातील सादरीकरण करण्यात आले. या रूग्णालयात एस. टी. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यात येतील, तसेच पाच लाखांपर्यंतच्या शस्त्रक्रियांचा खर्च राज्यशासन करेल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
यावेळी परिवहनचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.