क्रीडा

घाटकोपर जॉली जिमखाना राज्य कॅरम स्पर्धेत प्रशांत – आकांक्षा जेते

मुंबई :

घाटकोपर जॉली जिमखाना आयोजित दुसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात माजी विश्व विजेत्या प्रशांत मोरेने मुंबईच्या महम्मद घुफ्रानवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत २३-१७, ९-२३ व २५-१ अशी मात करून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. या सामन्यात पहिल्या सेटमध्ये चौथ्या बोर्डात प्रशांतने व्हाईट स्लॅमची नोंद केली.

तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या पुरुषांच्या लढतीत मुंबई उपनगरच्या संदीप दिवेने मुंबईच्या राहुल सोलंकीला २५-०, १३-१९, २५-१६ असे पराभूत केले. तर महिलांच्या अंतिम सामन्यात तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने मुंबईच्या मिताली पाठकला २५-१९, १२-२१, २५-१३ असे पराभूत करून या गटाचे विजेतेपद पटकाविले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या महिलांच्या लढतीत मुंबईच्या रिंकी कुमारीने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरला २५-५, १५-२२, २५-५ असे पराभूत केले.

महिलांच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यापूर्वी मिताली पाठकने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरला २१-१४, १६-१७, २१-२० असे तर आकांक्षाने मुंबईच्या रिंकी कुमारीवर २४-१४, २५-१४ अशी मात केली होती. दुसरीकडे पुरुषांच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या प्रशांतने मुंबई उपनगरच्या संदीप दिवेवर १७-१३, २५-१३ अशी तर महम्मद घुफ्रानने मुंबईच्या राहुल सोळंकीवर ८-२२, २५-११, २५-७ अशी मात केली होती.

विजेत्यांना घाटकोपर जॉली जिमखान्याचे मानद सचिव मुकेश बदानी व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांच्या शुभ हस्ते रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी राज्य कॅरम संघटनेचे खजिनदार अजित सावंत, मुंबई उपनगर जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष चव्हाण तसेच घाटकोपर जॉली जिमखान्याचे खजिनदार बलवंत संगरका व मिकीन सेठ, ट्रस्टी मारिश गांधी व नीलकंठ सेठ,स्पोर्ट्स समन्वयक प्रशांत कार्या व स्पर्धा समन्वयक नलिन मेहता उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *