मुंबई :
विद्याविहार रेल्वे स्थानकातून राजावाडी रुग्णालयाकडे चित्तरंजन कॉलनीतून जाणाऱ्या मार्गावर साप व विंचू यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये जाणाऱ्या कर्मचारी व रुग्णांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रात्रपाळीला असलेल्या कर्मचाऱ्यांची अवस्था अधिकच बिकट होत आहे.
विद्याविहार रेल्वे स्थानकातून राजावाडी रुग्णालयात जाण्यासाठी सोमय्या महाविद्यालयाकडून एक मार्ग आहे तर दुसरा मार्ग हा चित्तरंजन काॅलनीतून जाणार आहे. चित्तरंजन कॉलनीतून राजावाडी रुग्णालयाकडे जाणारा मार्ग हा सर्वात जवळचा मार्ग आहे. त्यामुळे कर्मचारी, परिचारिका तसेच रुग्ण रुग्णलयात जाण्यासाठी या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. हा मार्ग म्हाडाच्या जागेतून जात असून, या मार्गाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा, डेब्रिज पडलेले आहे. तसेच या मार्गाच्या बाजूने मोठा नाला जात आहे. त्यामुळे या भागामध्ये बऱ्याचदा साप व विंचू याचे वास्तव्य आढळून आले आहे. परंतु मागील काही दिवसांपासून या मार्गावर मोठ्या प्रमाणात साप दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या कर्मचारी, परिचारिकांची मोठी कोंडी होत आहे. सोमय्या महाविद्यालयाच्या दिशेने रुग्णालयात जायाचे झाल्यास कामावर पोहचण्यास विलंब होताे. त्यामुळे कर्मचारी व परिचारिका यांना जीव मुठीत घेऊन चित्तरंजन कॉलनीतील मार्गावरून जावे लागत आहे. कर्मचारी, परिचारिका व रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता शिव आरोग्य सेनेने या मार्गाची पाहणी केली. या मार्गावर असलेले डेब्रिज उचलण्यासाठी शिव आरोग्य सेनेचे मुंबई समन्व्यक प्रकाश वाणी व विधानसभा संघटक सचिन भांगे यांनी एन विभागाच्या सहाय्य्क आयुक्तांना पत्र देत या विभागाची साफसफाई करण्याची विनंती केली. त्यानुसार महानगरपालिकेने मार्गावरील साफसफाई केली, परंतु म्हाडाच्या जागेमध्ये असलेले डेब्रिज मुंबई महानगरपालिकेकडून काढण्यात न आल्याने सापांचा सुळसुळाट कायम आहे.
राजावाडी रुग्णालयात जाताना अनेक कर्मचाऱ्यांच्या पायावरून साप गेल्याने तसेच अनेकांनी साप पाहिल्याने रुग्णालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच रात्रपाळीला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन राजावाडी रुग्णालयाच्या दिशेने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे डेब्रिज साफसफाई करण्याबाबत म्हाडाकडेही शिव आराेग्य सेनेकडून तक्रार करण्यात आली आहे, मात्र म्हाडाकडून राजावाडी रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील साफसफाई करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे शिव आरोग्य सेनेचे मुंबई समन्व्यक प्रकाश वाणी यांनी सांगितले.