कल्याण :
कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सनराइज गॅलेक्सी या इमारतीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेक तक्रारींनंतरही पालिका दुर्लक्ष करत असून, रहिवाशांना शौचलयाचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. हे पाणी पिऊन अनेक नागरिक, विशेषतः लहान मुलं, आजारी पडली आहेत. याबाबत पालिकेने त्वरित कारवाई केली नाही, तर रहिवाशांनी उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
कल्याण पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबडेकर रोडवर सनराइज गॅलेक्सी इमारत हि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयापासून जवळच आहे. याठिकाणी 60 ते 70 कुटुंबे राहत आहेत. गेल्या आठ दिवसांपूर्वी या इमारतीची पाणीपुरवठा करणारी पाण्याची लाईन फुटल्यामुळे इमारतीतील पिण्याच्या नळातून ड्रेनेजचे पाणी येत आहे. या पाण्यामुळे रहिवाशांमध्ये विविध आजार पसरले आहेत, काही जणांनी रुग्णालयातही उपचार घेतले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून या इमारतीतील रहिवाशांनी अनेक तक्रारी महानगरपालिकेकडे केल्या आहेत मात्र याबाबत संबंधित अधिकारी व पालिका कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याने या इमारतीतील रहिवाशांना धुणे भांडी करण्यासाठी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.
तर पिण्यासाठी पाणी देखील दररोज 300 ते 400 रुपये खर्च करुन विकत घ्यावे लागत असल्याने खर्चात मोठा ताण आला आहे. याचं कारण म्हणजे रुग्णालयाचा खर्च आणि पाणी विकत घेण्याचा खर्च वाढला आहे. यामुळे मध्यमवर्गीय या कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. यामुळे हे स्थानिक रहिवाशांनी पालिका कर घेते पाण्याचे बिल प्रत्येक महिन्यात घेते मग योग्य सेवा का दिली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिक संतप्त होत पालिकेने त्वरित समस्या न सोडवली तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.