मुंबई :
अल्ट्रा झकास, मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म, प्रजासत्ताक दिनानिमित्त खास प्रस्तुती घेऊन येत आहे. ‘सौभाग्यवती सरपंच’ ही ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारी वेब सिरीज २२ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होत असून, आज या वेब सिरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.
‘सौभाग्यवती सरपंच’ ही फक्त एका स्त्रीच्या यशाची कहाणी नाही, तर ती प्रत्येक महिलेच्या संघर्षाला प्रेरणा देणारी आहे. महिला सशक्तीकरण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक असून, स्वातंत्र्य, शिक्षण, आणि नेतृत्व या तीन गोष्टी प्रत्येक महिलेचे हक्क आहेत हेच या वेब सिरीस मधून आपल्याला पाहायला मिळेल.
एका सामान्य गृहिणीच्या कर्तृत्वाचा आणि तिच्या यशाचा प्रवास म्हणजेच ‘सौभाग्यवती सरपंच’. महिला आरक्षित सरपंच पदावर निवडून आल्यानंतर एका सध्या गावातली गृहिणी कशी विकासासाठी स्वतःला झोकून देते आणि रूढीवादी मानसिकतेला कसा प्रतिउत्तर देते, याची प्रेरणादायी कथा या सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते. अवलीच्या संघर्षाचा आणि यशाचा प्रवास प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी एक संदेश ठरणार आहे – स्वप्न पाहण्याचे आणि ते पूर्ण करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे.
या सिरीजमध्ये देविका दफ्तरदार, किशोर कदम, आशा ज्ञाते, नागेश भोसले, अश्विनी कुलकर्णी, पद्मनाभ भिंड आणि अन्य प्रमुख कलाकारांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. संतोष कोल्हे यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले असून, ही कथा नातेसंबंध, पुरुषप्रधान व्यवस्थेतील मानसिकता, आणि महिला सशक्तीकरण यावर भाष्य करते.
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे सीईओ, श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “‘सौभाग्यवती सरपंच’ ही सिरीज केवळ मनोरंजन देत नाही, तर ती सामाजिक परिवर्तन सुद्धा करते. प्रेक्षकांना या सिरीजमधून महिला सशक्तीकरणाची प्रेरणा मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. अल्ट्रा झकास नेहमीच प्रेक्षकांसाठी दर्जेदार आणि अर्थपूर्ण कंटेंट आणण्याचा प्रयत्न करत असतो.
म्हणूनच प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र संधीवर, महाराष्ट्रातील ग्रामीण भारतातील महिलांच्या शक्तीचा हा अनोखा प्रवास ज्यात त्यांनी कधीही न पाहिलेल्या स्वप्नांची भरारी २२ जानेवारीपासून फक्त अल्ट्रा झकासवर ‘सौभाग्यवती सरपंच’ तुम्हाला पाहायला मिळेल.