पुणे :
भारताचे पहिले पॅरालम्पिक गोल्ड मेडलिस्ट मुरलीकांत पेटकर यांचे संघर्षमय जीवन नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रमुख साजिद नाडियादवाला यांनी मोठ्या पडद्यावर आणले. पेटकर यांनी देशासाठी बजावलेल्या कामगिरीला तब्बल 52 वर्षे उलटून गेल्यानंतर अर्जुन पुरस्कार (आजीवन)ची घोषणा करण्यात आली.
हा प्रतिष्ठित पुरस्कार लाभल्याविषयी मुरलीकांत पेटकर म्हणाले, “अर्जुन जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याने मी खरोखरच भारावून गेलो आहे. मी सर्वांचा खूप आभारी आहे. ही मान्यता केवळ वैयक्तिक कामगिरी नाही, तर अनेक अविश्वसनीय व्यक्तींच्या सामूहिक प्रयत्नांचा आणि विश्वासाचा पुरावा आहे. ‘चंदू चॅम्पियन “या सिनेमाच्या माध्यमातून माझी कथा पडद्यावर आणण्यासाठी त्यांनी माझ्या कथेवर विश्वास ठेवला; शिवाय विश्वास आणि स्रोतात गुंतवणूक केली म्हणून मी साजिद नाडियाडवालाजींचे मनापासून आभार मानू इच्छितो. त्यांच्या अविचल पाठिंब्यामुळे सर्व फरक पडला आहे. मोठ्या पडद्यापर्यंतच्या माझ्या प्रवासाचे प्रामाणिकपणे दिग्दर्शन करण्यासाठी कबीर खान यांनी केलेल्या प्रयत्नांचाही मी उल्लेख करू इच्छितो. तसेच अभिनेता कार्तिक आर्यन यांनी आपल्या अभिनय क्षमतेने सिनेमाला परिपूर्णता आणली. हा पुरस्कार-प्राप्तीचा क्षण जितका माझा आहे तितकाच त्यांचा आहे. हा सिनेमा बनवण्यासाठी आणि माझ्या कथेने देशातील अनेक लोकांना प्रेरणा देण्यासाठी मी ‘चंदू चॅम्पियन’च्या संपूर्ण टीमचा खरोखर आभारी आहे.”
क्रीडा प्रकारांत ऑल-राऊंडर असलेले पेटकर यांनी पॅरा-स्विमिंगमध्ये सर्वोत्तम कामगिरी बजावण्यापूर्वी विविध क्षेत्रात यश मिळवले होते. ते ऐतिहासिक यश आणि शूरतेचे मूर्तिमंत उदाहरण ठरले आहेत.