भिवंडी :
भिवंडी शहरालगत भादवड-सोनाळे रोड येथील पाईपलाईन रोड या मार्गाने अवैधरित्या परराज्यातील (दादरा नगर हवेली) येथे विक्रीस असलेले विदेशी मद्य व बिअरचा साठा घेऊन जाणाऱ्या टेम्पोला राज्य उत्पादन शुल्कच्या भिवंडी विभागाने पकडून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली.
राज्यात बंदी असलेल्या मद्याच्या साठा पिकअप टेम्पो या वाहनामधून भिवंडी ग्रामीण भागातून नेला जाणार आहे, अशी खात्रीलायक गुप्त खबरीनुसार भिवंडीतील राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने भादवड-सोनाळे रोड, पाईपलाई रोड, भादवड, या ठिकाणी गुरुवारी रात्रीच्या वेळी दबा धरुन थांबले होते. दरम्यान वाहन क्र. एम एच ४८/ जी-०१५६ हा टेम्पो जवळ येताच पथकाने चालकास वाहन थाबविण्यास सांगितले. तेव्हा चालकाने ताब्यातील वाहन थोडे पुढे नेऊन त्याने रोडच्या बाजूला थांबविले. टेम्पो चालक अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळून गेला. त्याचा शोध घेतला असता तो न मिळाल्याने त्याला फरार घोषीत करुन पथकाने वाहनाची झडती घेतली. त्यामध्ये एकूण १११ बॉक्स मद्य साठा मिळुन आला, त्यात बिअरचे १०४ बॉक्स व विदेशी मद्याचे ७ बॉक्स मिळून आले. वाहनासह मद्याचा साठा असा एकूण १० लाख ३० हजार ५२० रुपयाचा मुद्देमाल पथकाने जप्त करुन गुन्हा नोंद करण्यात आला. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क भिवंडी विभागाचे निरीक्षक एस.एस. खंडेराय हे करत असून राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाचे अधीक्षक प्रविण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी विभागाचे निरीक्षक एस.एस. खंडेराय, त्यांचे सहकारी दुय्यम निरीक्षक संजय बोधे, महादेव कवडे, संजय वाकचौरे, सहा.दु.नि.अर्जुन कापडे, जवान हर्षल खरबस, गणेश पाटील, सचिन पवार, स्वरुपा भोसले आदी टिमने ही कामगिरी बजावली.