नालासोपारा :
एसटी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी पंचसूत्री आणली आहे.ही चांगली बाब आहे. प्रवासी व उत्पन्न वाढीसाठी अश्या प्रकारच्या योजना राबविणे आवश्यक असून आम्ही त्याचे स्वागत करतो. पण ज्या कर्मचाऱ्यांच्या परिश्रमावर एसटीचा हा एवढा मोठा डोलारा उभा राहिला आहे. त्यांना आजही अधिकारी व पर्यवेक्षक यांच्याकडून सन्मानाची वागणूक मिळत नाही. काही अधिकारी अजूनही अरेरावीची भाषा करीत असून एसटीत पंचसूत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सोबत सन्मानसुत्रीची गरज असल्याचे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या, पालघर विभागाच्या वतीने आयोजित नालासोपारा आगाराच्या समोर झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते.
एसटीत रजा मंजूर करण्याची पद्धत व चालक, वाहक कामगिरी कुणी लावावी या बाबतच्या चांगल्या मार्गदर्शक सूचना वाहतूक विभागाने हल्ली प्रसारित केलेल्या नवीन परिपत्रकात प्रसारित केल्या आहेत. सोबत अशाच प्रकारच्या पूर्वीच्या परिपत्रकांचा हवालाही देण्यात आला आहे. पण काही आगारात अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. हे दुर्दैवी असून चालक वाहक व यांत्रिकी कर्मचारी हे महामंडळाचे मुख्य घटक आहेत. ते समाधानी असतील तरच व्यवस्थापनाने घालून दिलेल्या नवीन पंचसूत्रीची चांगली अंमलबजावणी होईल. म्हणून पंचसूत्रीची यशस्वी अंमलबजावणी व्हावी असे वाटत असेल तर चालक वाहक व यांत्रिकी कर्मचारी यांना सन्मानाने वागवले पाहिजे, पण ते स्थानिक पातळीवर अजूनही होताना दिसत नाही, असेही बरगे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
एसटीमधील काही अधिकारी आणि पर्यवेक्षक हे एसटीचा मुख्य घटक असलेल्या चालक, वाहकांना काही शंका असल्यास किंवा त्यांच्या अडचणीच्या वेळी अधिकाऱ्यांची भेट मागितल्यास केबिन बाहेर ताटकळत उभे ठेवतात. हे गैर असून याउलट एसटीत वरिष्ठ पातळीवर मुंबई सेंट्रल येथील मुख्य कार्यालयात मात्र महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक किंवा सर्व विभागांचे महाव्यवस्थापक कुठल्याही कर्मचाऱ्याला अगदी सहजपणे भेटत असतात. त्यांच्या शंकांचे निरसन करीत असतात. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी चिठ्ठी देण्याची पद्धत मध्यवर्ती कार्यालयात बंद करण्यात आली आहे. ही बाब खरोखरच चांगली व कौतुकास्पद आहे. म्हणून एसटीत पंचसूत्री खरोखरच यशस्वी करायची असेल तर कर्मचाऱ्यांना भेटीसाठी ताटकळत ठेवणाऱ्या आगार तसेच विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांना मध्यवर्ती कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिपत्रक काढून समज दिली पाहिजे असेही बरगे यांनी या वेळी बोलताना सांगितले.
पूर्वीच्या तुलनेत पालघर विभागाचे काम चांगले
पालघर विभागात कैलाश पाटील हे विभाग नियंत्रक म्हणून रुजू झाल्या नंतर त्यांच्या नेतृत्वात १२ वर्षापासून रखडलेले कर्मचाऱ्यांचे ग्रेडेशनचे काम ५० %पूर्ण झाले असून फेब्रुवारी पासून प्रलंबित असलेली वार्षिक वेतनवाढ फरकाची रक्कम देण्याचे काम सुद्धा जवळ जवळ पूर्ण झाले आहे. औद्योगिक शांतता प्रस्थापित करण्यात पालघर विभाग अव्वल स्थानी असून बस स्थानक परिसर व कर्मचारी विश्रांतीगृह स्वच्छतेत आता पूर्वीच्या तुलनेत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. पुरेसे कर्मचारी व गाड्या असत्या तर त्यांच्या कामाचा पूर्वीचा अनुभव पाहता पालघर विभाग सुद्धा एक नंबरला आला असता असेही बरगे यावेळी बोलताना सांगितले.
या सभेला काँग्रेसचे स्थानिक नेते प्रकाश पाटील, राम पारधी,विभागीय अध्यक्ष बालाजी जाधव, विभागीय सचिव अनिता वळवी, उपाध्यक्ष कमलाकर जोशी, डेनीस फर्नांडिस, प्रवीण लांडगे, संतोष चव्हाण, मोहन म्हात्रे, जयश्री कंचकटले, रामदास पोले,किमया कालेकर, उज्वला राऊत, सुधीर शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.