मुंबई :
मुंबई मॅरेथॉनमध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी होतात. रविवारी झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना २७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर जवळपास २०१८ लोकांना वैद्कीय मदतीची गरज भासली. यामध्ये पायामध्ये गोळे येणे, निर्जलीकरण आणि लहानसहान दुखापती झाल्या आहेत. रुग्णालयामध्ये दाखल रुग्णांपैकी एका रुग्णाला हृदयाचा त्रास सुरू झाल्याने त्याच्यावर बॉम्बे रुग्णालयात तातडीने ॲण्जिओप्लास्टी करण्यात आली.
प्रत्येक वर्षी जानेवारीच्या तिसऱ्या रविवारी मुंबई मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. यंदाच्या २० व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये मुंबईसह देशविदेशातील नागरिक, सेलिब्रेटी, दिव्यांग, तरुणाई व वृद्ध व्यक्ती मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते. मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंना योग्य वेळी वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी एशियन हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे डॉक्टर, परिचारिका, फिजियोथेरेपिस्ट आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसह ६०० स्वयंसेवकांची तुकडी सज्ज ठेवण्यात आली होती. मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा जवळपास ६२ हजार धावपटू सहभागी झाले होते. यातील २०१८ जणांना वैद्यकीय मदतीची गरज भासली, तर २७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय मदतची गरज भासलेल्या धावपटूंपैकी ५५ टक्के धावपटूंना पायात गोळे येणे, निर्जलीकरण आणि लहान दुखापती झाल्या. तसेच रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या २७ जणांमध्ये हृदयविकाराचा झटका, रक्तस्राव, तीव्र निर्जलीकरण, फ्रॅक्चर झाल्याची माहिती एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे कंसल्टेंट कार्डियोलॉजिस्ट व वैद्यकीय संचालक डॉ. संतोष कुमार डोरा यांनी सांगितले. बॉम्बे रुग्णालयात १५, लीलावती रुग्णालयात ५, पोद्दार रुग्णालयात २, जसलोक रुग्णालयात ३ आणि जी.टी. रुग्णालय व सैफी रुग्णालयात प्रत्येकी एका रुग्णाला दाखल केले. यापैकी १६ जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले असून, उर्वरित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. संतोष कुमार डोरा यांनी सांगितले.
बॉम्बे रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी दोघांना तीव्र निर्जलीकरणाचा त्रास झाल्याने ते खाली पडून जखमी झाले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू असून त्यांना जीवरक्षक प्रणाली लावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मॅरेथॉनमध्ये धावताना अचानक छातीत दुखू लागल्याने एका ४८ वर्षीय व्यक्तीला बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची तपासणी केली असता तातडीने ॲण्जिओप्लास्टी करण्याची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर ॲण्जिओप्लास्टी केल्याची माहिती बॉम्बे रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
जी. टी. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला निर्जलीकरणाचा त्रास झाला होता. या रुग्णावर उपचार करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जी.टी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जीतेंद्र संकपाळ यांनी दिली.