मुंबई :
एसटी महामंडळाच्या १३६० हेक्टर जमिनीचा विकास करण्यासाठी क्रेडाई (CREDAI) या संस्थेने आपले योगदान द्यावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. परिवहन मंत्री सरनाईक यांनी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज’ ने आयोजित केलेल्या प्रदर्शनाला भेट दिली. त्याप्रसंगी मंत्री बोलत होते.
सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाचे राज्यभरात ८४२ ठिकाणी १३६० हेक्टर जमीन उपलब्ध आहे. या जागांचे शहरी, निम-शहरी आणि ग्रामीण असे वर्गीकरण करण्यात आले आहे. बांधा वापरा आणि हस्तांतरित करा अथवा खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर या जमिनी विकसित करून तेथे एसटी महामंडळाला आवश्यक असलेली बसस्थानके, आगार आणि आस्थापना कार्यालय संबंधित विकासकाकडून बांधून घेण्यात यावीत. त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी किमान १०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय, इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर पॅनलसारखे पर्यावरण पूरक प्रकल्प उभारणे अपेक्षित आहे. या बदल्यात संबंधित विकासकाला त्या जमिनीवर त्याच्या सोयीनुसार व्यावसायिक क्षेत्र विकसित करता येईल.
यासंदर्भातील सर्वसमावेशक धोरण लवकरच एसटी महामंडळ आणणार असून यासाठी सूचना आणि प्रस्ताव क्रेडाई यासारख्या देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील नामवंत संस्थेने द्यावेत, असे आवाहनही क्रेडाई मंत्री सरनाईक यांनी केले. याप्रसंगी क्रेडाईचे अध्यक्ष डॉमनिक रोमेल व इतर पदाधिकारी, विकासक, वास्तुविशारद उपस्थित होते. एसटी महामंडळातर्फे वास्तुविशारद निलेश लहिवाल यांनी महामंडळाचे सादरीकरण केले.