क्रीडा

खो-खो विश्वचषक २०२५ : भारताचा दुहेरी सुवर्ण इतिहास, नेपाळला हरवून विश्वविजेतेपद पटकावले

नवी दिल्ली :

इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमच्या चकचकीत प्रकाशात आणि जल्लोषाच्या गजरात भारतीय पुरुष आणि महिला संघांनी खो-खोच्या पहिल्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावून इतिहास घडवला. नेपाळला अंतिम सामन्यात पराभूत करत भारतीय संघांनी संपूर्ण देशाला अभिमानाचा क्षण मिळवून दिला व भारतीय पुरुष व महिला संघांनी प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियमवर भारताचे नाव विश्वचषकावर सुवर्णअक्षरात कोरले. भारतीय खो-खो संघांनी एक अनोखा आणि गौरवास्पद इतिहास रचला आहे. भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी खो-खोच्या पहिल्या विश्वचषकात संपूर्ण स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवत पहिले विश्वविजेतेपद पटकावले. महिलंच्या सामन्यात भारताने नेपाळवर ७८-४० असा ३८ गुणांनी विजय साकारला. पुरुष अंतिम सामन्यात भारताने नेपाळला ५४-३६ असा १८ गुणांनी पराभूत केले.

महिलांच्या अंतिम सामन्यात पहिल्या टर्नमध्ये भारतीय संघाने आक्रमण करताना नेपाळची पहिली तुकडी ५० सेकंदात, दुसरी तुकडी १.४८ मि. तर तिसरी तुकडी १.२० मि. बाद केली व चौथी तुकडी १ मि. पाचवी तुकडी ४५ सेकंदात तर उरलेले दोन खेळाडू ३४ सेकंदाच्या आत बाद करत भारताच्या खेळाडूंनी ३४ गुण मिळवले या वेळी कर्णधार प्रियांका इंगळे, रेश्मा राठोड यांनी चमकदार खेळी केली.

दुसऱ्या टर्नमध्ये नेपाळच्या पहाडी मुलींनी कमालीचा खेळ करत भारताच्या ड्रीम रन   गुणसंख्येला वेसन घातले. नेपाळने भारताची पहिली तुकडी तीन मि. नंतर बाद केल्याने भारताला एक ड्रीम रन चैतरा बी ने मिळवून दिला. दुसरी तुकडी १.३९ मि. बाद करण्यात नेपाळला यश मिळाले. तर तिसरी तुकडी ५३ सेकंदाच्या आत तंबूत परतल्याने खरतर भारताला हा मोठा धक्का होता. त्यानंतर नेपाळने आपल्या आक्रमणाची धार वाढवून १.१३ मि. चौथ्या तुकडीला बाद केले. तर त्यानंतर पुढची तुकडी नाबाद खेळल्याने भारताने मध्यंतराला ३५-२४ अशी ११ गुणांची आघाडी घेतली होती.

तिसऱ्या टर्नमध्ये भारताने आक्रमणात नेपाळची पहिली तुकडी १.४२ मि. बाद करून जोरदार प्रतिउत्तर दिले तर दुसरी तुकडी ३३ सेकंदात बाद झाली. तिसऱ्या तुकडीला १.०७ मि. बाद करत भारताने मोठ्या गुणसंख्येकडे वाटचाल सुरु केली. चौथी तुकडी ५० सेकंदात कापून काढली. पाचवी तुकडी ५५ सेकंदात बाद करून नेपाळला जोरदार झटका दिला. तर सहावी तुकडी ३४ सेकंदात बाद करून नेपाळची आणखी एक झटका दिला. सातव्या तुकडीतील एक खेळाडू बाद करण्यात भारताला यश मिळाल्याने भारताने ७३-२४ अशी गुणांची नोंद केली. या वेळी नेपाळच्या दीप बी के ने चांगला खेळ केला.

चौथ्या टर्न मध्ये नेपाळने आक्रमण केले पण ते आक्रमण परतवून लावताने भारताच्या पहिल्या तुकडीने ५.१४ मि. वेळ देत नेपाळला सामन्यात पुन्हा परतण्याची संधीच न देण्याची किमिया साधली व हा सामना भारताने ७८-४० असा ३८ गुणांनी जिंकला.

भारतीय पुरुषांची जोरदार कामगिरी

भारताने सुरवातीपासूनच आक्रमक खेळ करताना नेपाळला जरा सुध्दा डोकं वर काढायला दिले नाही. पहिल्या टर्न मध्ये भारताने तब्बल चार तुकड्या बाद करून नेपाळला जोरदार धक्का दिला व या आक्रमणाच्या टर्नमध्ये भारताने २६-० असे गुण वसूल केले.

दुसऱ्या टर्न मध्ये नेपाळच्या आक्रमणात भारताची पहिली तुकडी २.४४ मि. संरक्षण करू शकली तर दुसरी तुकडी १.५९ मिनिटात बाद झाली. तर तिसऱ्या तुकडीतील खेळाडूंनी २.०२ मि. वेळ देत बाद झाली तर चौथी तुकडी नाबाद राहिली त्यामुळे मध्यंतराला २६-१८ असा गुणफलक दिसत होता.

तिसऱ्या टर्न मध्ये आक्रमण करताना भारताने नेपाळची पहिली तुकडी १.४९ मि. बाद केली तर दुसरी तुकडी १.१० मि. तंबूत परतली. तर तिसरी तुकडी अवघ्या ४५ सेकंदात बाद केली. चौथ्या तुकडीला १.०७ मि. बाद केले. पाचव्या तुकडीतील दोन खेळाडू बाद झाले. यावेळी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा गुणफलक ५४-१८ असे गुण दर्शवत होता.

चौथ्या व शेवटच्या टर्न मध्ये नेपाळने आक्रमणाला सुरवात केली व भारताची पहिली तुकडी दोन मिनिटात परतवण्यात नेपाळने यश मिळवले. तर दुसरी तुकडी २.१६ मि. बाद झाली तर तिसरी तुकडी २.०१ मि. बाद झाली तर चौथी तुकडी नाबाद राहिली. प्रतीक वाईकर, सचिन भार्गो (चिंगारी), मेहुल, आणि सुमन बर्मन यांच्या भक्कम बचावामुळे नेपाळला मोठा फटका बसला व भारताने हा सामना ५४-३६ असा १८ गुणांनी जिंकत विश्वचषकाला कवटाळले.

आज आम्ही इतिहास रचला, पण ही फक्त सुरुवात आहे. भारतीय महिलांचा खेळ प्रत्येक आंतरराष्ट्रीय मंचावर चमकणार, याची खात्री आहे. हा विजय प्रत्येक भारतीयासाठी समर्पित आहे.”
– प्रियांका इंगळे, कर्णधार, भारतीय महिला खो-खो संघ

आजचा विजय भारतीय खो-खोला नव्या उंचीवर नेणारा आहे. हा विजय देशासाठी आहे, भविष्यातही आम्ही अशीच कामगिरी करत राहू.”
– प्रतीक वाईकर, कर्णधार, भारतीय पुरुष खो-खो संघ

सर्व सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येकी २ कोटी २५ लाखांचे पारितोषिक आणि क्लास वन अधिकारी म्हणून नोकरी दिली जाणार आहे.
– चंद्रजीत जाधव, सहसचिव भारतीय खो खो महासंघ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *