डोंबिवली :
महाराष्ट्रात मराठी शाळांची घटती पटसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. विशेषतः पालिका आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटत असून, गरीब कुटुंबांची मुले खाजगी शाळेत शिक्षण घेऊ शकत नाहीत. यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न सुरू असून, शाळांचा दर्जा सुधारण्यावर भर दिला जात आहे.
डोंबिवलीत पै फ्रेंड्स लायब्ररी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मराठी शाळांच्या सक्षमीकरणाविषयी विचार मांडले. त्यांनी सांगितले की, राज्यातील काही मराठी शाळा अत्यंत उच्च दर्जाच्या आहेत, आणि अशा शाळांचा आदर्श घेऊन इतर पालिका आणि जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. कार्यक्रमाला आमदार रवींद्र चव्हाण, आमदार राजेश मोरे, पालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड, पै फ्रेंड्स लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै, अभिनेते एकता नार्वेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, “मराठी शाळांची गुणवत्ता खाजगी शाळांच्या तोडीस तोड असली पाहिजे, तरच अधिक विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतील. काही विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडून मराठी शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत, ही चांगली प्रवृत्ती आहे. सरकार अशा शाळांचा आदर्श घेऊन राज्यभर दर्जेदार शाळा सुरू करणार आहे, जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळू शकेल.”
याशिवाय, पै फ्रेंड्स लायब्ररीच्या उपक्रमांचे कौतुक करताना मंत्री सामंत म्हणाले की, “गेल्या आठ वर्षांपासून मराठी भाषा आणि संस्कृती जपण्याचे कार्य लायब्ररीकडून केले जात आहे. शासन मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून अशा उपक्रमांना पाठिंबा देईल. मराठी विश्वसंमेलनात हा उपक्रम राबविला जावा, यासाठी शासन सहकार्य करेल.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल आभार मानत, मंत्री सामंत यांनी सांगितले की, आता केंद्र सरकारकडून अनेक उपक्रमांना निधी मिळेल आणि मराठी भाषेचा जागतिक पातळीवर प्रचार होईल. सरकारच्या प्रयत्नांमुळे पालिका आणि जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावेल आणि अधिकाधिक विद्यार्थी मराठी माध्यमात शिक्षण घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.