आरोग्य

रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :

रुग्णसेवेच अखंड व्रत घेतलेले केईएम रुग्णालय हे मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने आधारवड आहे. ज्या विश्वासाने रुग्ण येथे येतात त्यांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले.
सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयाच्या ९९ वा वर्धापन दिन सोहळा रुग्णालयाच्या प्रांगणात झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार कालिदास कोळंबकर, सुनील शिंदे, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा, केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आदी उपस्थित होते.

केईएमने घेतलेले रुग्णसेवेचं व्रत अवघड आहे. आजही इथली रुग्णसेवा अहोरात्र चालू आहे. इथल्या डॉक्टरांचे, परिचारिकांचे, कर्मचाऱ्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. तुम्ही आहात, म्हणून सामान्य मुंबईकर जगतो आहे. सेवाभाव हा परमभाव आहे, असे आपली संस्कृती सांगते. डॉक्टर देखील वैद्यकीय क्षेत्रात येताना सेवाधर्माची शपथ घेतात. ही शपथ घेऊनच ९९ वर्षांपूर्वी हे रुग्णालय उभं राहिलं. आजही मुंबई आणि आसपासच्या रहिवाशांना आधार देत उभं आहे. घरातल्या आधारवडासारख्या बुजुर्ग व्यक्तीबद्दल आपल्याला आदरभाव असतो. आपुलकी असते, तशीच भावना केईएमबद्दल आहे. एखाद्या आरोग्य क्षेत्रातील संस्थेने सुवर्ण किंवा शताब्दी महोत्सव साजरा करणं ही त्या संस्थेसाठी अभिमानास्पद बाब असते. केईएम रुग्णालय हे देशातील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी एक आहे. केईएम हे कुटुंब आहे. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली जाते. सांस्कृतिक वारसा जपत अत्याधुनिकतेची कासही केईएमने धरली आहे. आरोग्य क्षेत्राच्या नव्या दिशा आणि आंतरराष्ट्रीय मानके केईएमने स्थापित केली आहे असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अविरत रुग्णसेवेची शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या आणि लाखो रुग्णांना जीवनदान देणाऱ्या केईएम रुग्णालयाच्या चरणी नतमस्तक होत आहे, अशी भावना व्यक्त केली.

केईएमसारखी रुग्णालये ही सर्वसमान्यांसाठी देवदूतासारखी आहेत. अरुणा शानबाग यांची ४१ वर्षे सेवा केईएमच्या कर्मचाऱ्यांनी केली. जगातल्या कुठल्याही रुग्णालयामध्ये रुग्णसेवेचं असं उदाहरण नसेल. केइएमसोबत नाव येतं ते जीएस वैद्यकीय महाविद्यालयाच. कितीतरी नामवंत, दिग्गज डॉक्टर या महाविद्यालयाच्या प्रांगणात तयार झाले. इथल्या डॉक्टरांची संशोधकांची कीर्ती जगभर पसरलेली असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी काढले.

केईएमच्या शताब्दी महोत्सवानिमित्त महानायक अमिताभ बच्चन यांच्याहस्ते फॅटी लिव्हरवरील उपचाराच्या क्लिनीकचे उद्घाटन झाले. ते या आजाराच्या जनजागृतीसाठी ब्रॅण्ड अम्बॅसिडर म्हणून काम करणार आहेत. त्याबद्दल अमिताभ बच्चन यांचे शासनाच्यावतीने आभार मानतो.

रुग्णालयात झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी लागू करावी त्याचबरोबर रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी शताब्दी महोत्सवी वर्षात आयुष्मान टॉवर उभे करतानाच रुग्णाच्या नातेवाईकांची परवड होवू नये यासाठी व्यवस्था निर्माण करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. याठिकाणी डॉक्टरांचे म्युझियम करण्यात यावे अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मरणिकेचे आणि वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *