मुंबई :
ज्येष्ठ रुग्णांना सहज आणि जलद उपचार व्हावेत यासाठी जी.टी. रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आठवड्यातील दोन दिवस विशेष बाह्य रुग्ण विभाग सुरु करण्यात आला आहे. बाह्यरुग्ण विभाग क्रमांक ३४ मध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये दोन दिवस हा विभाग सुरु राहणार आहे. या विभागामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता जी.टी. रुग्णालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
६० वर्षांवरील नागरिकांना साधारणपणे रक्तदाब, मधुमेह, स्मृतिभ्रंश यासारख्या आजारांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर त्यांना दृष्टी कमी होणे, पोटाचे विकार, हृदय विकार अशा समस्यांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना तातडीने उपचार मिळावेत, त्यांच्यावर डॉक्टरांकडून विशेष लक्ष दिले जावे, यासाठी जी.टी. रुग्णालयामध्ये ज्येष्ठ रुग्णांसाठी विशेष बाह्य रुग्ण विभाग सुरु करण्यात आला. बाह्य रुग्ण विभाग क्रमांक ३४ मध्ये आठवड्याच्या प्रत्येक बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ज्येष्ठ रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी या विभागामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टर कधी उपलब्ध असतील याची सहज माहिती मिळण्यास मदत होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना सांधेदुखीचा त्रास अधिक असल्याने अन्य डॉक्टरांसोबत अस्थिव्यंग तज्ज्ञही या बाह्यरुग्ण विभागामध्ये उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती जी.टी. रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. जीतेंद्र संकपाळ यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र खिडकी
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याबरोबरच या रुग्णांना नोंदणी करण्यासाठी व औषधे घेण्यासाठी त्रास होऊ नये यासाठी रुग्णालयामध्ये स्वतंत्र औषध व नोंदणी खिडकी सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना केस पेपर काढण्यासाठी लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणी खिडकीवर नोंद करण्यात येणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र नोंदणीपुस्तक ठेवण्यात आले आहे. जेणेकरून या रुग्णांची माहिती सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना उपाचारानंतर सहज औषधे मिळावीत आणि त्यांना औषधांसाठी रांग लावावी लागू नये यासाठी स्वतंत्र खिडकी सुरू केली असल्याचे डाॅ. जीतेंद्र संकपाळ यांनी सांगितले.