पालघर :
अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघ, नागपूर (मेंबर ऑफ द इंटरनॅशनल डान्स कौन्सिल सीआयडी पॅरिस फ्रान्स) आयोजित इंडो नेपाळ एशियन डान्स समित – इंटरनॅशनल डान्स चॅम्पियनशिप अँड फेस्टिवल, २८ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ पर्यंत काठमांडू नेपाळ येथे आयोजित करण्यात आले होते. या चॅम्पियनशिपमध्ये पालघर जिल्ह्यातील नवली गावातील प्रांजल प्रसन्न घरत हिने एकल भरतनाट्यम नृत्य सीनियर कॅटेगिरीमध्ये भाग घेतला होता. झालेल्या स्पर्धेमध्ये तिला प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. ट्रॉफी, गोल्ड मेडल आणि सन्मानपत्र देऊन तिचे कौतुक करण्यात आले.
इंडो नेपाळ एशियन डान्स समित – इंटरनॅशनल डान्स चॅम्पियनशिप अँड फेस्टिवल या स्पर्धेमध्ये विविध नृत्य प्रकारात भारतातील वेगवेगळ्या राज्यातून आणि नेपाळमधून समाविष्ट झालेल्या कलाकारांनी एकल आणि सांघिक नृत्यकला सादर केल्या. इंटरनॅशनल डान्स चॅम्पियनशिप अँड फेस्टिवल या स्पर्धेमध्ये पालघर जिल्ह्यातील कन्येने आपला ठसा उमटवला, हे खरंच कौतुकास्पद आहे.
प्रांजल प्रसन्न घरत ही सध्या रुईया कॉलेज, माटुंगा येथे प्रथम वर्ष मानसशास्त्राची विद्यार्थिनी आहे. ती गेली पाच वर्षे इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन आर्ट्स, पालघर शाखेतून गुरु तेज कजालिया यांच्याकडून भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेत आहे. यापूर्वीही प्रांजलने राष्ट्रीय स्तरावर तीन पारितोषिक मिळवले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिचे हे पहिले पारितोषिक आहे.