शहर

राज्यात एसटी, तर एमएमआरमध्ये रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ

मुंबई :

नवनियुक्त राज्य सरकारने राज्यातील जनतेला भाडेवाढीचे गिफ्ट दिले आहे. एसटी महामंडळाच्या वाहतूक सेवांच्या भाडे दरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. २४ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे. यासोबतच प्राधिकरणाने मुंबई महानगर प्रदेशातील सीएनजी काळी पिवळी मीटर -टॅक्सी आणि ऑटो रिक्षा यांचीही भाडेवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. १ फेब्रुवारीपासून ही भाडेवाढ लागू होणार असून काळी पिवळी मीटर -टॅक्सीचे भाडेदर २८ रुपयांवरून ३१ रुपये होणार आहे. तर रिक्षाचे भाडे २३ वरून २६ रुपये होणार असल्याने एमएमआर क्षेत्रातील नागरिकांना आर्थिक झळ सहन करावी लागणार आहे.

एसटी महामंडळाकडून करण्यात आलेल्या भाडेवाढीचा तक्ता

भाडेवाढ करण्याबाबतचे प्रस्ताव एसटी महामंडळ आणि रिक्षा -टॅक्सी संघटनांनी राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला. गृह विभागाचे (परिवहन) अपर मुख्य सचिव तथा अध्यक्ष राज्य परिवहन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) व परिवहन आयुक्त उपस्थित होते.वाहनासाठी आवश्यक असलेल्या डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किमतीत बदल झाल्यामुळे तसेच महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे भाडेवाढ सूत्रानुसार राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी १ जानेवारी रोजी महामंडळाच्या बसेसच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार ही भाडेवाढ करण्यात आली. यापूर्वी २६ सप्टेंबर २०११ रोजी भाडेवाढ करण्यात आली होती.

हकिम समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार महामंडळाला वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.१५ टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. ही भाडेवाढ २५ जानेवारी २०२५ रोजी (२४ जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर) पासून अंमलात येईल असे निर्देश प्राधिकरणाने दिले. तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पर्यावरणपुरक नवीन बीएस ६ मानकाच्या नविन साध्या बसेस टोमॅटो लाल रंगसंगतीस प्राधिकरणाने मान्यता दिली. त्याचप्रमाणे महामंडळाने ५० ई- बसेससाठी पांढरा व हिरवा रंग तसेच १०० बसेससाठी सद्यास्थितीत चालनात असलेल्या शिवनेरी प्रमाणे आकाशी याप्रमाणे रंगसंगतीस मंजुरी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *