आरोग्य

राज्यात प्रथमच जाहीर होणार ‘राज्य आरोग्य धोरण’

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा

मुंबई :

सार्वजनिक आरोग्य विभागाचा चेहरा- मोहरा बदलणारे, राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक बळकट व लोकाभिमुख करणारे महाराष्ट्राचे स्वतंत्र ‘आरोग्य विषयक धोरण’ बनविण्याचे निर्देश राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. भविष्यात महाराष्ट्रात ‘आरोग्य पर्यटन’ ही संकल्पना रुजवण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

४ फेब्रुवारी असलेल्या जागतिक कर्करोग दिन राज्य, जिल्हा स्तरावर व सर्व आरोग्य संस्थांमध्ये प्रभावीपणे राबविण्याच्या तसेच वाढते मधुमेहाचे रुग्ण पाहता आवश्यक तपासणी करुन उपाययोजना करण्यात याव्या. तसेच जागतिक कर्करोग दिनापासून महिला कर्करोग रुग्णांसाठी तपासणी शिबिरांचे आयोजन करून त्यांना योग्य उपचार विनामूल्य उपलब्ध करुन द्यावेत, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी या योजनेची व्यापक प्रसिद्धी करावी, वैद्यकीय देयके प्रतीपूर्तीचे प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे प्रलंबित राहतात. त्यामुळे सर्व वैद्यकीय देयके दप्तरी दाखल झाल्यापासून सात दिवसांत मार्गी लावण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

दिव्यांग व्यक्तींना प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे त्यांना जवळच्या ठिकाणी, सुलभतेने दिव्यांग प्रमाणपत्रे मिळावीत, यासाठी ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय स्तरावर शिबीर आयोजित करून निकषानुसार तपासणी करून प्रमाणपत्रे वितरित करण्याबाबत सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी दिल्या. दिव्यांगांना बोगस प्रमाणपत्रे देणारे व त्याद्वारे शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

आरोग्य सेवेपासून कोणताही नागरिक वंचित राहणार नाही यासाठी आरोग्य संस्थामधील ‘ब’ वर्गातील डॉक्टरांच्या रिक्त जागा तातडीने भरणे आवश्यक आहे. त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, तसेच आरोग्य खात्यांतर्गत शासकीय अधिकाऱ्यांच्या सुरु असलेल्या चौकशी प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा. योग्य असेल त्यांना न्याय द्यावा, अयोग्य असेल त्याला शास्ती करा, प्रकरणे प्रलंबित ठेवू नका, असे स्पष्ट निर्देश आबिटकर यांनी यावेळी दिले. बैठकीला सहसचिव विजय लहाने, अशोक अत्राम, उपसचिव शिवदास धुळे, दीपक केंद्रे यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *