क्रीडा

प्रकाश पुराणिक स्मृती महिला क्रिकेट स्पर्धा ४ फेब्रुवारीपासून

मुंबई :

माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिकेटपटू स्व. प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान शिवाजी पार्क मैदानात आयोजित करण्यात आली आहे. सलग तिसऱ्या वर्षी ही स्पर्धा माहीम ज्युवेनाईल व एसपीजी खेळपट्टीवर नामवंत १६ महिला संघांच्या सहभागाने रंगणार आहे. दिलीप वेंगसरकर फाउंडेशन विरुध्द डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स यामधील उद्घाटनीय लढत मंगळवारी सकाळी ८.३० वा. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल देऊन सुरु होईल. याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय नाईक व जनरल सेक्रेटरी अभय हडप तसेच अपेक्स कमिटी सभासद उपस्थित राहणार आहेत.

मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यतेने होणाऱ्या स्पर्धेतील प्रतिष्ठेचा स्व. प्रकाश पुराणिक स्मृती चषक पटकाविण्यासाठी दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजवाडी क्रिकेट क्लब, फोर्ट यंगस्टर्स, डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स, पय्याडे स्पोर्ट्स क्लब, साईनाथ स्पोर्ट्स क्लब, दहिसर स्पोर्ट्स क्लब, ग्लोरीयस क्रिकेट क्लब, रिगल क्रिकेट क्लब, व्हिक्टरी क्रिकेट क्लब, स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लब, भारत क्रिकेट क्लब, माटुंगा जिमखाना, एमआयजी क्रिकेट क्लब, स्पोर्टिंग युनियन क्लब, पालघर-डहाणू स्पोर्ट्स आदी महिला संघांमध्ये चुरस होईल. बाद पध्दतीने होणाऱ्या स्पर्धेची अंतिम फेरी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १.०० वा. माहीम ज्युवेनाईल खेळपट्टीवर होईल. अंतिम विजेत्या संघास रोख रु. ५०,०००/- व चषक, उपविजेत्यास रु.२५,०००/- व चषक आणि उपांत्य उपविजेत्या दोन्ही संघास प्रत्येकी रु.१५,०००/- पुरस्कार तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूस रु.१०,०००/-, उत्कृष्ट फलंदाज रु.५,०००/-, उत्कृष्ट गोलंदाज रु.५,०००/- व उदयोन्मुख खेळाडूस रु.५,०००/- पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती माहीम जुवेनाईल स्पोर्ट्स क्लबचे खजिनदार महेश शेट्ये यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *