
मुंबई :
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्याच्या इतिहासात प्रथमच “आरोग्य विषयक धोरण ” बनवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राज्याच्या आरोग्य धोरणात महत्वाचा भाग असलेल्या “आरोग्य पर्यटन” या विषयी सविस्तर चर्चा झाली. राज्यात आरोग्य पर्यंटनाला चालना देण्याचा तसेच त्या माध्यमातून, रोजगार निर्मिती व आरोग्य विषयक सुविधांची निर्मिती या बाबत मंत्री महोदय यांनी सुचना केल्या.
भारतात अनेक ठिकाणी परदेशीं नागरिक वैद्यकीय उपचारासाठी येत असतात. त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देवून, महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. आरोग्य पर्यटन प्रकल्पात उत्तम सेवा देणाऱ्या खासगी रुग्णालयाना सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णालयाना नामांकन देण्यात येणार आहे. नामांकन प्राप्त रुग्णालयांची सेवा, पायाभूत सुविधा, संबंधित डॉक्टराचे शिक्षण अनुभव, एक्स्पर्टन्सी या बाबतची माहिती शासनाच्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्यामुळे जगभरातील रुग्ण महाराष्ट्रातील सरकारी व खासगी रुग्णाल्ययात उपलब्ध सेवेचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे खासगी व सरकारी रुग्णालयात आर्थिक उन्नती होईल. सरकारी रुग्णालये सुद्धा उत्तम सेवा देवून खासगी रुग्णालयाच्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करतील असा विश्वास मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.
आरोग्य पर्यटन विषयाचा मसुदा तयार करण्यासाठी एक अभ्यास गट (expert committee) स्थापन करण्यात येणार आहे. या अभ्यास गटा मधील तज्ञ अधिकारी राज्यातील नामांकित खासगी रुग्णालये, विविध शहरातील रुग्णालये, आयुष विभाग, पर्यटन विभाग, नॅचरोपॅथी विभाग, माध्यम प्रतिनिधी यांचा समावेश करून त्यांच्या सूचना घेऊन एक सर्वसमावेशक आरोग्य पर्यटन धोरण (Health tourism Policy ) बनवणार आहे. राज्याच्या आरोग्य धोरणामध्ये आरोग्य पर्यटन हा महत्वाचा भाग असेल. म्हणून आरोग्य पर्यटन विषयाला गती देण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष निर्माण करून याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आरोग्य मंत्र्यांनी दिल्या आहेत.
बैठकीला आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव वीरेंद्र सिंह, आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक, संचालक डॉ.नितीन आंबाडेकर यांचेसह अधिकारी उपस्थित होते