क्रीडा

प्रकाश पुराणिक स्मृती महिला क्रिकेट स्पर्धा :  एमआयजी वि. वेंगसरकर फाउंडेशनमध्ये अंतिम लढत

मुंबई : 

क्रिकेटपटू स्व. प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत एमआयजी क्रिकेट क्लब विरुध्द दिलीप वेंगसरकर फाउंडेशन यामध्ये ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १.०० वा. माहीम ज्युवेनाईल खेळपट्टीवर माजी कसोटीपटू करसन घावरी व एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या स्पर्धेमधील उपांत्य सामन्यात एमआयजी क्रिकेट क्लबने बलाढ्य फोर्ट यंगस्टर्सचे आव्हान सुपर ओव्हरमध्ये संपुष्टात आणले तर दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने व्हिक्टरी क्रिकेट क्लबचा ८ विकेटने पराभव केला. सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार वेंगसरकर फाउंडेशनची कप्तान पूनम राऊत व एमआयजी क्लबची अनिशा रौत यांनी पटकाविला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या एमआयजी क्रिकेट क्लबने सलामी फलंदाज महेक मिस्त्रीच्या (६५ चेंडूत नाबाद ९० धावा) दमदार फलंदाजीमुळे मर्यादित २० षटकात ४ बाद १६३ धावांचा पल्ला गाठला. हिया पंडित (२५ धावांत २ बळी) व मानसी पाटील (३५ धावांत २ बळी) यांनी छान गोलंदाजी केली. रिया चौधरी (३० चेंडूत ४८ धावा) व जान्हवी काटे (२१ चेंडूत ३१ धावा) यांनी सलामीचा पाया मजबूत केल्यामुळे विजयी लक्ष्याचा पाठलाग फोर्ट यंगस्टर्सला १८ व्या षटकाला ८ बाद १६२ धावसंख्येपर्यंत सोपा वाटत होता. परंतु विजयी धावा फटकाविण्याच्या नादात फोर्ट यंगस्टर्सचे शेवटचे दोन्ही फलंदाज एमआयजी क्लबच्या चपळ क्षेत्ररक्षकांनी धावचीत केले आणि त्यांना बरोबरीच्या १६३ धावसंख्येवर गुंडाळले. ऑफ ब्रेक गोलंदाज अनिशा रौतने २२ धावांत ६ बळी घेतले.

सुपर ओव्हरमध्ये अनिता रौतच्या (५ धावांत २ बळी) अचूक फिरकी माऱ्यामुळे फोर्ट यंगस्टर्सला २ बाद ५ धावाच काढता आल्या. महेक मिस्त्रीच्या आक्रमक फलंदाजीमुळे एमआयजी क्रिकेट क्लबने तीन चेंडूत विजयाला गवसणी घालून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दिलीप वेंगसरकर फाउंडेशन विरुध्द व्हिक्टरी क्रिकेट क्लबने अलीना मुल्ला (३५ चेंडूत ३६ धावा) व तनवी परब (२५ चेंडूत नाबाद ३९ धावा) यांच्या फलंदाजीमुळे २० षटकात ७ बाद १५८ धावसंख्या उभारली. रेश्मा नायक व पूनम राऊत यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. सारा सामंत ( ३७ चेंडूत ६६ धावा) व पूनम राऊत (४० चेंडूत नाबाद ६६ धावा) यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने १७.५ षटकात २ बाद १६० अशी विजयी धावसंख्या फटकावून अंतिम फेरीत धडक दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *