
मुंबई :
काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी डोंगरी येथील शासकीय औद्योगिक संस्थेला देण्यात आलेले भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव बदलण्याची मागणी केली होती. मात्र, या मागणीला ठाम विरोध दर्शवत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे की, डॉ. कलाम यांचे नाव कोणत्याही परिस्थितीत बदलले जाणार नाही.
मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, राज्यभरातील सर्व शासकीय औद्योगिक संस्थांना प्रथमच अधिकृत नावे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या आधी कोणत्याही शासकीय औद्योगिक संस्थेला अधिकृत नाव नव्हते. त्या-त्या परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तींची नावे किंवा देशासाठी योगदान दिलेल्या विभूतींच्या नावांवरून या संस्थांना ओळख दिली जात आहे.
आमदार अमीन पटेल यांनी हाजी अब्दुल रहमान शाह बाबा दर्गाह या नावाने डोंगरी येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण करावे, अशी मागणी केली होती. त्यांनी हा मुद्दा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई शहराच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला.
या मागणीला उत्तर देताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे केवळ भारताचे माजी राष्ट्रपती नव्हते, तर त्यांनी देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दिलेले योगदान अभूतपूर्व आहे. त्यांच्या नावाने ओळखली जाणारी कोणतीही संस्था म्हणजे विज्ञान, प्रगती आणि राष्ट्रसेवेचे प्रतिक आहे. त्यामुळे डोंगरी येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नाव बदलले जाणार नाही.”
मंत्री लोढा पुढे म्हणाले, “या संस्थेच्या नावात बदल होणार नाही, उलट आम्ही मोठा कार्यक्रम आयोजित करून भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नावाचा अधिकृत फलक त्या ठिकाणी लावू. याबाबत आम्ही कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही.”
राज्यातील शासकीय औद्योगिक संस्थांना नाव देताना स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या व्यक्तींच्या योगदानाचा सन्मान केला जात आहे. सरकारने या संदर्भात घेतलेल्या निर्णयाला कुठलाही अपवाद केला जाणार नाही. शासकीय औद्योगिक संस्था केवळ नावापुरती संस्था नाही, तर त्या कौशल्य विकासाचे महत्त्वपूर्ण केंद्र आहेत. त्यामुळे त्यांची ओळख ज्या विभूतींशी जोडली जाते, त्यांचे महत्त्व लक्षात घेऊनच नाव दिले जाते. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव या संस्थेला मिळणे ही गौरवाची बाब आहे आणि ते नाव कायम राहील, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे.