
मुंबई :
एसटी महामंडळात झालेले घोटाळे व भोंगळ कारभारामुळे झालेल्या नुकसानीच्या विविध वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांचे खुलासे संबधित अधिकाऱ्यांनी सरकारकडे वेळेत दिले नसल्याने या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाला हस्तक्षेप करून बैठक घेऊन खुलासे मागवावे लागले, ही शरमेची बाब असून वेळेत खुलासे सादर न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
एसटी महामंडळातील विविध घोटाळे व अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे झालेल्या नुकसानीबाबतीत विविध वृत्तपत्रातील प्रसिद्ध झालेल्या एकूण १४ पैकी १२ बातम्यांचे खुलासे मुख्यमंत्री कार्यालयाला व शासनाला वेळेत प्राप्त झाले नव्हते, यातील काही बातम्यांचे खुलासे दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण होऊन सुद्धा संबधित विभागाला देण्यात आले नव्हते. वृत्तपत्र अथवा वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध होणाऱ्या नकारात्मक बातम्या संदर्भात संबंधित विभागाने तातडीने वस्तूस्थितीजन्य खुलासा सादर करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दिले आहेत. परंतु या आदेशाची पायमल्ली एसटीतील विविध विभागांनी केल्याची यावरून दिसून येते. वृत्तपत्रातील नकारात्मक बातम्यांचा जर खुलासा वेळेत झाला नाही तर त्या बातम्यांची सत्यता वाढून एसटीची प्रतिमा मलिन होते. त्यासाठी संबंधित विभागाने बातमीचा वस्तूस्थितीजन्य खुलासा जनसंपर्क विभागामार्फत संबंधित वृत्तपत्रांना देणे आवश्यक असते. परिणामी एसटीची प्रतिमा जनमानसात मलीन करणाऱ्या या बेपर्वाईची दखल घेत दिनांक ७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री कार्यालयातील संबधित अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करून आढावा बैठक घ्यावी लागली. हे दुर्दैवी असून वेळेत खुलासे सादर न करणाऱ्या व बेपर्वाई हे वागणाऱ्या एसटीच्या नुकसानीस जबाबदार असलेल्या, घोटाळेबाज संबधित अधिकाऱ्यांवर प्रमादिय कारवाई करण्यात आली पाहिजे असेही बरगे यांनी म्हटले आहे.