क्रीडा

प्रकाश पुराणिक स्मृती महिला क्रिकेट स्पर्धा : दिलीप वेंगसरकर फाउंडेशन विजेता

मुंबई :

क्रिकेटपटू स्व. प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने विजेतेपद पटकाविले. निर्णायक सामन्यात दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने सलामी फलंदाज सारा सामंत (४५ धावा) व कप्तान पूनम राऊत (नाबाद ४७ धावा) यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे एमआयजी क्रिकेट क्लबचा ८ विकेटने पराभव करून अजिंक्यपदाला गवसणी घातली. . माजी कसोटीपटू करसन घावरी यांच्या हस्ते बक्षीस समारंभ संपन्न झाला.

माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतिम सामन्यात दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने नाणेफेक जिंकून एमआयजी क्रिकेट क्लबला प्रथम फलंदाजी दिली. प्रारंभ २ बाद १५ धावा असा निराशाजनक होऊनही मिताली म्हात्रे (५२ चेंडूत ५२ धावा, ५ चौकर) व महेक मिस्त्री (३० चेंडूत २७ धावा, ४ चौकार) यांनी डाव सावरला. त्यामुळे एमआयजी क्लबने मर्यादित २० षटकात ६ बाद १२० धावांचा टप्पा गाठला. मध्यमगती गोलंदाज सिध्दी पवारने २६ धावांत ३ बळी घेतले.

सलामी फलंदाज सारा सामंत ( २२ चेंडूत ४५ धावा, ९ चौकार) व अष्टपैलू पूनम राऊत (३४ चेंडूत नाबाद ४७ धावा, ८ चौकार) यांच्या फटकेबाजीमुळे दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने विजयी लक्ष्य १३.५ षटकात २ बाद १२३ धावा झळकावून साध्य केले. परिणामी एमआयजी क्रिकेट क्लबला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार वेंगसरकर फाउंडेशनची कप्तान पूनम राऊतने पटकाविला. याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, सेक्रेटरी अभय हडप, खजिनदार अरमान मलिक, जॉईंट सेक्रेटरी दीपक पाटील तसेच अपेक्स कौन्सिल मेंबर, विजय येवलेकर, संजू खानोलकर, सुनील रामचंद्रन, सुनील पाटील, महेश शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *