
मुंबई :
डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रातून दुहेरी पदवीचे शिक्षण घेता येणार आहे. या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रविष्ठ होऊन एकाच वेळी दोन पदव्या घेता येणार आहेत. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थित नुकताच मुंबई विद्यापीठ दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र आणि डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजनीश कामत आणि कुलसचिव प्रा. विलास पाध्ये उपस्थित होते.
या करारान्वये डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ हे यजमान विद्यापीठ म्हणून काम पाहणार आहे. तर दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्र हे सहयोगी संस्था म्हणून काम पाहणार आहे. डॉ. होमी भाभा विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणारे विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या पदवीच्या बीए. बीकॉम, बीकॉम ( अकाऊंटिंग अँड फायनान्स ), बीएस्सी (माहिती तंत्रज्ञान, संगणक शास्त्र) या अभ्यासक्रमांना दुहेरी पदवीसाठी प्रविष्ठ होऊ शकतील. तर पदव्युत्तर शिक्षणासाठी एमए (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क, शिक्षणशास्त्र) एमकॉम ( एडव्हान्स अकाऊंटन्सी, बिझनेस मॅनेजमेंट) एमस्सी (मॅथेमॅटिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि संगणकशास्त्र, एमएमएस आणि एमसीए अशा अभ्यासक्रमांची निवड करू शकतील.
एखाद्या व्यक्तीला एक किंवा अधिक विशेष क्षेत्रांमध्ये करीअर करण्याची आवड असेल, त्याचबरोबर भाषा विषयक ज्ञानार्जन आणि संवाद कौशल्य वृद्धींगत करावयाचे असल्यास त्या विषयांचा सखोल स्तरावर अभ्यास करण्यासाठी त्या व्यक्तीला सक्षम करण्याच्या गरजेवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमधून विचारशील, उत्तम आणि सर्जनशील व्यक्ती घडवण्यासाठी त्यास विज्ञान, सामाजिक विज्ञान, कला, मानव्यविद्या, भाषा, तसेच व्यावसायिक आणि तांत्रिक विषयांसह विविध विषयांची उपलब्धता निर्माण करण्यावर शैक्षणिक धोरणात तरतूद करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने या कराराचे महत्व अधोरेखित होणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
यजमान विद्यापीठ म्हणून डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठाच्या वतीने नजीकच्या काळात दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगसारख्या अनुषंगिक उद्योन्मुख प्रगत क्षेत्रामध्ये विविध अभ्यासक्रम तयार करून दिले जातील. दुहेरी पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा खूप मोठा फायदा होईल.
– प्रा. राजनीश कामत, कुलगुरू, डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ