
घाटकोपर :
कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती देशभरात मराठी राजभाषा दिवस म्हणून उत्साहात साजरा केली जाते. साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेतील इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थांनी आज मराठी राजभाषा दिनाचे निमित्त साधत ग्रंथ दिंडी काढली. समता शिक्षण संस्थेचे सचिव राजेश सुभेदार, कार्याध्यक्षा ज्योती सुभेदार यांच्या संकल्पनेतून या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत ही दिंडी साकीनाका परेरावाडी पासून टिळक नगर, असल्फा मार्गे टाळ, मृदंग, वीणाचां निनाद करत काढण्यात आली.
महाराष्ट्र ही संताची, समाजसुधारकांची भूमी असल्याने या दिंडीत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, जगदगुरू संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, एकनाथ, मुक्ताई, कवी कुसुमाग्रज, पू. ल. देशपांडे, आण्णा भाऊ साठे , मधू मंगेश कर्णिक यांची वेशभूषा करणारे विद्यार्थी या दिंडीत सहभागी होऊन समाजाला मराठीचा जागर, मराठी भाषा वाचवा मराठीचा अभिमान बाळगा असा मोलाचा संदेश देण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका गीता बलोदी, वैशाली हांडे, प्रतीक्षा गोरे, मोरकर सर, भरत भोईर, रेश्मा चासकर , राहुल सोनावणे आदी शिक्षकांनी दिंडी यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.