
मुंबई :
केईएम रुग्णालयामध्ये २०१९ ते २०२४ या सहा वर्षांमध्ये १ हजार १७६ नवजात अर्भकांचा मृत्यू झाला आहे. केईएममध्ये मुंबईसह आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात गर्भवती महिला प्रसूतीसाठी येत असतात. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात नवजात अर्भकांचा मृत्यू होणे गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणाऱ्या सर्व रुग्णालयांमध्ये होणाऱ्या नवजात बालकांच्या मृत्यूबाबत रुग्णालय स्तरावर चौकशी करुन पुढील मृत्यू टाळण्यासाठी योग्य ते प्रतिबंधक उपाय योजले जात असल्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.
मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये मुंबईसह आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिक उपचारासाठी येत असतात. यामध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचे प्रमाणही अधिक आहे. मात्र केईएम रुग्णालयामध्ये २०१९ ते २०२४ या सहा वर्षांच्या कालावधीमध्ये नवजात शिशु विभागामध्ये १ हजार १७६ नवजात अर्भकांचा मृत्यू झाला आहे. २०१९ मध्ये २२५ नवजात अर्भकांचा मृत्यू झाला असून, २०२० मध्ये २०६ मृत्यू, २०२१ मध्ये १७९ मृत्यू, २०२२ मध्ये १८८ मृत्यू, २०२३ मध्ये १७९ मृत्यू व २०२४ मध्ये १९९ अशा एकूण १ हजार १७६ नवजात अर्भकांचा मृत्यू झाला आहे. नवजात अर्भकांचा मृत्यू होण्यामागील प्रमुख कारणांमध्ये मातेचे वजन कमी असणे, प्रसूतीपूर्वी झालेला संसर्ग, प्रसूतीदरम्यान झालेली गुंतागुंत, बाळाला ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा न होणे अशी महत्त्वाची कारणे असल्याचे प्रसूतीतज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. मात्र केईएम रुग्णालयामध्ये सहा वर्षांमध्ये १ हजार १७६ बालकांचा मृत्यू होणे गंभीर बाब असल्याचा मुद्दा आमदार सुनील शिंदे यांनी विधानपरिषदेमध्ये उपस्थित केला होता. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणाऱ्या सर्व रुग्णालयांमध्ये होणाऱ्या नवजात बालकांच्या मृत्यूबाबत रुग्णालय स्तरावर चौकशी करण्यात येत आहे. तसेच नवजात अर्भकांचे मृत्यू टाळण्यासाठी योग्य ते प्रतिबंधक उपाय योजण्यात येत आहेत. तसेच, गरोदर महिलांच्या सर्वंकष आरोग्याच्या दृष्टीने योग्य समयी नाव नोंदणी करणे, त्यांना औषधोपचार व आहार पुरविणे, त्यांचे समुपदेशन करण्यात येत असल्याचे सांगितले.