
मुंबई :
सुरेश (भैयाजी) जोशी, माजी सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विशेष उपस्थितीत आणि महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या उपक्रमांतर्गत, मुंबईत पहिल्यांदाच केवळ भारतीय पारंपारिक खेळांसाठी स्वतंत्र मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साकारण्यात आला आहे व पुढेही सुरु राहील. कुर्ला ITI येथील मोकळ्या मैदानाचे ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर क्रीडांगण’ असे नामकरण करून त्याचे भूमिपूजन पार पडले. याचसोबत, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोवंडी, जि मुंबई उपनगर या संस्थेचे नामकरण ‘जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोवंडी’ असे करण्यात आले आहे.
प्रसंगी बोलताना सुरेश (भैयाजी) जोशी म्हणाले “स्वामी विवेकानंद, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, महाराणा प्रताप आणि जामसाहेब या ४ विभूतींच्या नावाचे वलय या प्रांगणाला लाभले असल्याने येथील ऊर्जा भारावून टाकणारी आहे. नव्या पिढीला नक्कीच येथे अखंड प्रेरणा मिळेल. आपला वारसा जपण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.
“समाजासाठी निस्वार्थी वृत्तीने काम करणारे जामसाहेब मुकादम आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत. वकिलाच्या पेशात सर्वोच्च स्थानी असताना सुद्धा वयाच्या ५०व्या वर्षी त्यांनी आपली सनद सोडली आणि समाजकार्याचा वसा हाती घेतला. निवृत्त होणं, भौतिक सुखांचा भोग घेणं त्यांना सहज शक्य होतं पण त्या सर्वांचा त्याग करून, त्यांनी समाजासाठी योगदान दिले. आज भैय्याजी जोशी यांच्या उपस्थितीमध्ये गोवंडी आयटीआयला जामसाहेब मुकादम यांचे नाव देण्यात येत आहे ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे.” असे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
या मैदानावर कबड्डी, खो-खो, लंगडी, मलखांब, कुस्ती, लगोरी, लेझीम, विटी-दांडू, पंजा लढवणे, दंड बैठक, दोरीच्या उड्या, पावनखिंड दौड, रस्सीखेच, फुगडी, सुरपाट्या, उंचउडी, पकडा-पकडी, सूरपारंब्या, भोवरा फिरवणे, आंधळी कोशिंबीर, लंपडाव यांसारख्या पारंपारिक भारतीय खेळांना प्राधान्य दिले जाणार आहे. स्थानिक खेळाडूंना तसेच युवा पिढीला या खेळांसाठी दर्जेदार सुविधा आणि नियमित सरावाची संधी मिळणार आहे. हा उपक्रम भारतीय पारंपारिक खेळांना चालना देण्यासाठी आणि नव्या पिढीला या खेळांचे महत्त्व पटवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
भारतीय क्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी आणि युवा पिढीला देशी पारंपारिक खेळांकडे वळवण्यासाठी मा श्री मंगल प्रभात लोढा यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली.
याआधीही त्यांनी डिसेंबर २०२३ मध्ये मुंबई उपनगरात ‘क्रीडा महाकुंभ’ स्पर्धेचे आयोजन करून भारतीय खेळ आणि खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. २ मार्च २०२५ पासून नाशिक येथे राज्यातील औद्योगिक शासकीय संस्थांसाठी पारंपारिक देशी खेळांचे ‘क्रीडा महाकुंभ’ आयोजित करण्यात आले आहे.