
मुंबई :
महाराष्ट्रात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे, मराठी संस्कृतीची आणि साहित्याची सर्वांना ओळख करून देणे ही उद्दिष्ट्ये समोर ठेवून पारिजात मुंबई तर्फे प्रत्येक वर्षी २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. पारिजात सदस्यांबरोबर अनेक शाळा, विद्यार्थी, पालक, कलाकार आणि हौशी लोक या उपक्रमात सहभागी होतात.
या निमित्ताने पारिजात मुंबई या संस्थेतर्फे गेल्या सहा वर्षांपासून मराठी भाषा दिनानिमित्ताने घेण्यात येणारी “गोष्ट मराठीची” “शालेय विद्यार्थ्यांसाठी सांघिक कथा अभिवाचन स्पर्धा” शनिवार, दि. १ मार्च २०२५ रोजी नविनचंद्र मेहता इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलेपमेंट, दादर पश्चिम येथे पार पडली. या स्पर्धेत मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व कल्याण येथील केवळ मराठीच नव्हे तर इंग्रजी शाळाही सहभागी झाल्या होत्या. विविध शाळांमधून दोन्ही गटात बरेच विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर स्पर्धेच्या दिवशी विद्यार्थी, पालक, शिक्षक, परीक्षक, पारिजात सदस्य उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण समीर दळवी आणि निलेश माने यांनी केले. दरवर्षी नवनवीन शाळा या स्पर्धेत सहभागी होत असल्याचे चित्र दिसत आहे. पुढील काही वर्षांत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात या स्पर्धेचे आयोजन करण्याचा पारिजातचा मानस आहे.
गेल्या वर्षापासून पारिजाततर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी अशी आगळीवेगळी अभिवाचनाची स्पर्धा पुणे शहरातही घेण्यात येत आहे. ज्याला पुणेकर शाळा उत्तम प्रतिसाद देत आहेत. यावर्षी रविवार दि. २ मार्च २०२५ रोजी पुण्यातील मनपा प्राथमिक शाळा क्रमांक ५४, पिंपळे-गुरव – ४११०६१ येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत विविध शाळांमधून दोन्ही गटात बरेच विद्यार्थी सहभागी झाले. पुणे येथील स्पर्धेसाठी गौरी देशपांडे आणि रुचिका खोत यांनी परीक्षक म्हणून काम केले.
ह्या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी मराठी साहित्यिकांचे कथासंग्रह आणि कादंबरी यांचे वाचन केले. हा उपक्रम राबविण्यामागे वाचन संस्कृती मुलांमध्ये रुजावी, त्यांच्यात मराठी साहित्याची आवड आणि मराठी भाषेबद्दल गोडी वाढावी हाच पारिजातचा हेतू आहे. याबद्दल शिक्षक आणि पालकांनीही खूपच समाधान आणि आनंद व्यक्त केला. सर्वच शाळांनी या उपक्रमाचे आणि पारिजात संस्थेचे मनापासून स्वागत केले. या अभिनव उपक्रमासाठी नवीनचंद्र कॉलेजतर्फे संचालकांकडून दरवर्षी पारिजात संस्थेस स्पर्धेसाठी व “मराठी भाषा दिन” कार्यक्रम साजरा करण्यासाठी कॉलेजचे वर्ग आणि हॉल मोफत उपलब्ध करून देण्यात येतो. सर्व परीक्षकांनीही स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे अभिवाचन ऐकून खूपच समाधान व आनंद व्यक्त केला. पारिजात मुंबई राबवत असलेल्या या उपक्रमासाठी त्यांनी पारिजात संस्थेचे कौतुक करून भरपूर शुभेच्छा दिल्या.
मुंबई येथील स्पर्धेत पाचवी ते सातवी गटामधून दिंडी’झ अभिनय छंदवर्ग, भायखळा (कथा – विदेशी मुलगा, लेखक – योगेश शिरसाठ) या शाळेने तर आठवी ते दहावी गटामधून पुणे विद्यार्थी गृहाचे विद्याभवन माध्यमिक इंग्रजी शाळा, नेरूळ (कथा – रामायणातील श्रावण बाळाची पौराणिक कथा) या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. पुणे यथील स्पर्धेत पाचवी ते सातवी गटामधून भारतीय विद्या भवन सुलोचना नातू विद्यामंदिर,शिवाजीनगर (कथा – पांडू आजोबा) या शाळेने तर आठवी ते दहावी गटामधून देखील भारतीय विद्या भवन सुलोचना नातू विद्यामंदिर, शिवाजीनगर (कथा – मांजर व्हा) याच शाळेने प्रथम क्रमांक पटकावला.
मुंबई व पुणे येथील या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अनुक्रमे १ मार्च व २ मार्च रोजी संध्याकाळी साजरा झाला. त्यावेळी परीक्षकांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कथा अभिवाचन बद्दलचे मार्गदर्शन केले. कला व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि पारिजातचे स्नेही इत्यादी लोकांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले आणि भरभरून प्रतिसाद दिला.