क्रीडा

५८ व्या सब ज्युनियर महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : आयुष, तनया, प्रसन्ना, निधी ठरले राज्य विजेते 

मुंबई : 

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आणि सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या ५८ व्या सब ज्युनियर महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या १४ वर्षाखालील एकेरी गटातील मुलांच्या अंतिम फेरीत पुण्याच्या आयुष गरुडने मुंबईच्या रुद्र गवारेवर १९-९, १५-१ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून विजतेपद पटकाविले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात कोल्हापूरच्या ओंकार वडारने ठाण्याच्या वेदांत पाटणकरवर २१-०, २१-४ असा विजय मिळविला.

१४ वर्षाखालील मुली एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरच्या तनया दळवीने रत्नागिरीच्या स्वरा कदमवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत १४-११, १२-१५ व १९-५ असा चुरशीचा विजय मिळवून या गटाचे विजेतेपद पटकाविले. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत रत्नागिरीच्या स्वरा मोहिरेने पुण्याच्या तनया पाटीलवर ११-४, २-१७ व ७-६ असा निसटता विजय मिळविला.

१२ वर्षाखालील मुलांमध्ये अंतिम फेरीत मुंबई उपनगरच्या प्रसन्ना गोळेने बाजी मारली. त्याने सिंधुदुर्गच्या भारत सावंतवर २१-९, २१-० असा सहज विजय मिळविला. या गटात तिसरा क्रमांक प्राप्त करताना पालघरच्या देवराज कथाडेने पुण्याच्या रुद्रा इंगळेवर २१-०, २१-६ अशी मात केली. १२ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या निधी सप्रेने ठाण्याच्या देविका जोशीला २२-०, २३-० असे सहज नामवंत विजेतेपदाला गवसणी घातली. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत ठाण्याच्या जान्हवी पानवलकरने सिंधुदुर्गच्या दिव्या राणेला ७-४, ८-१५, १२-९ असे हरविले.

विजेत्यांना राज्य कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम संघटनेचे सहसचिव संजय बर्वे आदी मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *