
मुंबई :
शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्रातील पदवीसाठी आवश्यक असलेल्या बी.एड (सामान्य व विशेष), बीएड-एमएड, एमएड आणि एम.पी.एड या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्ररीक्षेला नोंदणीला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बीएड अभ्यासक्रमासाठी पाच वर्षांतील विक्रमी अर्जनोंदणी झाली असून यंदा एक लाख १६ हजार ५०० विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी चुरस रंगणार आहे.
शिक्षणशास्त्राअंतर्गत येणाऱ्या बी.एड (सामान्य व विशेष), बीएड-एमएड, एमएड या अभ्यासक्रमांना तर शारीरिक शिक्षणशास्त्राअंतर्गत येणाऱ्या एम.पी.एड या अभ्यासक्रमांच्या या प्रवेश परीक्षा मार्चमध्ये होणार आहेत. त्यासाठी राबविण्यात आलेली नोंदणी प्रक्रिया २८ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आली. मात्र अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज अर्धवट असल्याने व अनेकांनी शुल्क भरलेले नसल्याने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने विद्यार्थ्यांना अर्ज पूर्ण करण्यास, अर्जाच्या तपशीलात दुरुस्ती करणे तसेच शुल्क भरण्यासाठी ५ मार्चदरम्यान संधी दिली होती. या संधीचा अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेत नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यानुसार यंदा बीएड अभ्यासक्रमासाठी राज्यभरातून १ लाख १६ हजार ५०० विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. मागील पाच वर्षांमधील ही सर्वाधिक अर्ज नोंदणी आहे. गतवर्षी बीएड अभ्यासक्रमासाठी ७९ हजार ८३ विद्यार्थ्यांनी २०२३-२४ मध्ये ७९ हजार ९८४ विद्यार्थ्यांनी २०२२ – २३ मध्ये ८७ हजार ८७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा ही परीक्षा २४ मार्च रोजी होणार आहे.
बीएड-एमएड प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही काहीअंशी वाढ झाली. बीएड-एमएड अभ्यासक्रमासाठी १ हजार १३० विद्यार्थ्यांनी अर्ज केले. गतवर्षी १ हजार ३६ विद्यार्थांनी अर्ज केले होते. ही परीक्षा २८ मार्च रोजी होणार आहे. एमएड अभ्यासक्रमासाठी यंदा ३ हजार ८०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ९०० विद्यार्थ्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षी एमएडसाठी २ हजार ९८५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. ही परीक्षा १९ मार्च रोजी होणार आहे. एमपीएड या शारीरिक शिक्षण विषयासाठी असलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी यंदा २ हजार ३८४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. गतवर्षी ही संख्या २ हजार ६८६ विद्यार्थी इतकी होती. ही परीक्षा १९ मार्च रोजी होईल.