
मुंबई :
ग्लोबल कोकण महोत्सवाने यंदा सगळे विक्रम मोडले! तब्बल २ लाखांहून अधिक लोकांनी ४ दिवसाच्या या महोत्सवाला भेट दिली, तर शेवटच्या दिवशीच १ लाख लोकांनी कोकणाचं वैभव अनुभवायला हजेरी लावली. कोकणात व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या १००० नवोदित उद्योजकांनी बिझनेस कॉन्क्लेव्हमध्ये मार्गदर्शन घेतलं.
उद्योग मंत्री उदय सामंत, स्वागत अध्यक्ष भरत शेठ गोगावले, ग्लोबल कोकण फेस्टिवलचे अध्यक्ष्य संजय यादवराव यांच्या मागर्दशना खाली आता ग्लोबल कोकण महोत्सव आता कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांवरही रंगणार, ज्यामुळे स्थानिकांना अधिक संधी मिळतील आणि कोकणात पर्यटक देखी येतील.
ग्रामीण कोकणच्या विकासासाठी संजय यादवराव यांनी बनवलेली व्यवस्था शासकीय कारणांमुळे मागे पडली होती, पण ग्राम विकास मंत्री योगेश कदम यांनी ती प्रभावीपणे राबवण्याचं आश्वासन दिलं आहे. यामुळे कोकणच्या पर्यटन आणि कृषी पर्यटन व्यवसायाला अधिक गती मिळणार आहे. विदेशातून कोकणात परतलेली नुपूर हिने गुहागरमध्ये होमस्टे सुरू करून पुन्हा कोकणातच राहण्याचा निर्णय घेतला, तर पूर्ण मानसी यादवराव यांनी कोकणला डेस्टिनेशन वेडिंग आणि फॅमिली व्हेकेशनसाठी लोकप्रिय करण्यासाठी स्वतःची पर्यटन कंपनी सुरू केली.
महोत्सवाचं उद्घाटन फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले, “अस्सल कोकण पाहायचं असेल, त्याची चव घ्यायची असेल, तर हा महोत्सव नक्की अनुभवावा.” ‘स्टार्ट अप कोकण – मेक इन कोकण’ या भन्नाट संकल्पनेमुळे कोकणच्या विकासाला मोठी चालना मिळाली. राहुल कॉलेज ऑफ एजुकेशन संस्थेच्या मदतीने कोकणातील स्टार्टअप्सना थेट आयपीओपर्यंत पोहोचवण्याची योजना आहे.
ग्लोबल कोकण फेस्टिव्हलमध्ये ५०० हून अधिक उद्योजकांनी सक्रिय सहभाग नोंदवला, ज्यामुळे कोकणातील उद्योग क्षेत्राला मोठा चालना मिळाला आहे. उद्योग विस्तार, गुंतवणूक आणि नवे उपक्रम यावर भर देत कोकणातील उद्योगसृष्टी समृद्ध करण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरले आहे. या फेस्टिव्हलमध्ये १००० हून अधिक लोकांनी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले, ज्यामुळे नवउद्योजक आणि विद्यार्थ्यांना व्यवसाय व रोजगाराच्या संधींबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. नवीन तंत्रज्ञान, स्टार्टअप आणि उद्योग धोरणांबाबत जागरूकता निर्माण होत असून, युवकांचा व्यवसाय व उद्योग क्षेत्रातील सहभाग वाढताना दिसत आहे. या फेस्टिव्हलमध्ये पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त उद्योगांवर विशेष भर देण्यात आला. निसर्गसंपत्तीचे संरक्षण आणि विकास यांचा समतोल राखत पुढे जाण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. औद्योगिक प्रगतीसोबतच कोकणातील पारंपरिक शेती, मत्स्यव्यवसाय आणि पर्यावरणपूरक व्यवसायांना चालना देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कोकणातील उद्योग आणि व्यवसाय क्षेत्राला चालना मिळावी म्हणून कोकण चेंबर ऑफ कॉमर्समध्ये ३०० नवीन नोंदण्या झाल्या आहेत. यामुळे स्थानिक उद्योजकांना अधिक संधी मिळणार असून, व्यावसायिक नेटवर्क वाढण्यास मदत होणार आहे. संपूर्ण वर्षभर नवनवीन उपक्रम, उद्योग मेळावे आणि व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जाणार आहेत, जे नवउद्योजक आणि व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. या उपक्रमांमुळे कोकणातील आर्थिक प्रगतीला चालना मिळेल आणि नवीन रोजगार संधीही निर्माण होतील.
चार दिवस चाललेल्या महोत्सवात लोककला सादरीकरण, कोळी नृत्य, पालखी नृत्य, तारपा, गोंधळ, जाखडी, आणि गौरी नृत्य यासारख्या पारंपरिक कलांनी रंगत आणली. ग्लोबल कोकण महोत्सवात संगीतप्रेमींसाठी खास कार्यक्रम सादर करण्यात आला – ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’. प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा कार्यक्रम मराठी भाषेचा, संस्कृतीचा आणि अभिमानाचा अनोखा उत्सव ठरला.
यंदा पहिल्यांदाच मराठी तरुणांसाठी हिप-हॉप आणि रॅप संगीताचा भव्य कार्यक्रम झाला. Rukus Avenue Radio (USA) च्या सहकार्याने हिप-हॉप, रॅप, बीटबॉक्सिंग, आणि फ्रीस्टाईल परफॉर्मन्समुळे तरुणाईला जागतिक व्यासपीठ मिळालं. त्याचसोबत, हिंदू धर्मातील समृद्ध परंपरेचं दर्शन घडवणारा दशावतार नाट्यप्रकारही लोकांना भावला. भगवान विष्णूंच्या दहा अवतारांची भव्य सादरीकरणं पाहताना प्रेक्षक भारावून गेले. हा महोत्सव म्हणजे कोकणाच्या गौरवशाली वारशाला ग्लोबल स्तरावर नेणारी क्रांती आहे. पुढच्या वर्षी कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवरही हा सोहळा गाजेल, हे नक्की!