मनोरंजन

“वाट माझी बघतोय रिक्षावाला” या गाण्याचा धमाकेदार रिमिक्स – मराठी गाण्यात हिंदी रॅपचा नवा धमाका

मुंबई : 

मुंबई, ११ मार्च २०२५ – प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि तुफान लोकप्रिय ठरलेल्या “वाट माझी बघतोय रिक्षावाला” या गाण्याचा नवा अवतार सादर झालेला आहे. २००९ मध्ये प्रसिद्ध झालेलं हे गाणं मूळतः रेश्मा सोनावणे यांनी गायलेलं. आजही मराठी संगीताच्या हिट लिस्टमध्ये आहे. अशातच आता नव्या बीटवर आणि तुफान हिंदी रॅपच्या जोडीनं हे गाण परत आलं आहे, ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला २.०’ अल्ट्रा म्युझिक आणि कृणाल म्युझिक यांच्या सहयोगाने, सुप्रसिद्ध रॅपर संदीप नेगी यांनी या गाण्याला नव्या शैलीत आणलं असून, दिग्दर्शक सचिन रामचंद्र अंबट यांनी त्याला भव्य दृकश्राव्य रुप दिलं आहे.

मराठी गाण्यात हिंदी रॅपचा नवा धमाका

या नव्या आवृत्तीत गाण्याच्या पारंपरिक ठेक्याला आधुनिक स्पर्श देण्यात आला आहे. मराठी बीट्स आणि समकालीन हिंदी रॅप यांचा उत्तम मिलाफ असलेल्या या गाण्याला तरुणाईत तुफान प्रतिसाद मिळत आहे. संदीप नेगीच्या जोशपूर्ण रॅपच्या जोडीनं या गाण्याला अधिक दमदार स्वरूप प्राप्त झालं असून, मराठी संगीताच्या परंपरेत एक नवा प्रयोग म्हणून हे गाणं उभं राहील आहे. व्हिडिओत मीरा जोशी आणि विश्वास पाटील ह्या दोघांनी आपल्या धमाकेदार परफॉर्मन्सने प्रेक्षकांना ठेका धरायला लावलं आहे. व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा रंग कायम ठेवत नव्या जमान्याचं स्पर्श देण्यात आला आहे.

“वाट माझी बघतोय रिक्षावाला २.०” या नव्या रिमिक्समध्ये मराठी लोकसंगीताला कायम ठेवत, त्याला समकालीन टच देण्यात आला आहे. त्यामुळे गाण्याच्या मूळ चाहत्यांबरोबरच तरुण पिढीही त्याला तितकाच प्रतिसाद देतेय. अल्ट्रा म्युझिक आणि कृणाल म्युझिक यांनी नेहमीच मराठी संगीताच्या समृद्धतेला पुढे नेण्यासाठी योगदान दिलं असून, लावणी, कोळीगीते, भक्तिगीते आणि पारंपरिक मराठी संगीतप्रकारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे.

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट ग्रुपचे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल म्हणतात, “वाट माझी बघतोय रिक्षावाला २.०” हे गाणे स्थानिक संगीत क्षेत्रात एक नवा ट्रेंड सेट करणार आहे. जे परंपरा आणि नावीन्यपूर्णतेची आस असलेल्या संगीत चाहत्यांना आकर्षित करेल. हे नवं व्हर्जन या वर्षाचं हिट गाणं ठरणार आहे आणि मराठी म्युझिक इंडस्ट्रीत धमाका करणार आहे,”

या रिमिक्सबद्दल म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शक सचिन रामचंद्र अंबट म्हणाले, “या लोकप्रिय गाण्याला नव्या ढंगात सादर करणं हे एक आव्हान होतं, पण आम्ही त्याचा मूळ आत्मा कायम ठेवत त्याला आधुनिक संगीताचा तडका दिला आहे. प्रेक्षकांना हा नॉस्टॅल्जिया आणि नावीन्याचा मिलाफ नक्कीच आवडेल.” रॅपर संदीप नेगी म्हणतात, “मराठीत पहिल्यांदाच असं हटके रॅप-रिमिक्स आणतोय. हा बीट ऐकलात की, पाय आपोआप थिरकायला लागतील!”

कोणत्या प्लॅटफॉर्मवर ऐकता येईल?

“वाट माझी बघतोय रिक्षावाला २.० ” या गाण्याचं रिमिक्स व्हर्जन आता YouTube, Spotify, JioSaavn, Apple Music, Amazon Music आणि इतर प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे. पारंपरिक मराठी संगीत आणि आधुनिक रॅपचं हे फ्युजन संगीतप्रेमींना निश्चितच आवडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *