
मुंबई :
रंग, गुलाल उधळत शुक्रवारी मुंबईकरांनी धुळवडीचा आनंद लुटला, मात्र त्याचवेळी विविध ठिकाणी होळी खेळताना ५२ जण जखमी झाले आहेत. यामध्ये अनेकांच्या डोळ्याला, डोक्याला व पायाला मार लागला आहे. या सर्वांवर रुग्णालयांमध्ये उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जखमींचे प्रमाण कमी असून, गतवर्षी ९३ जण जखमी झाले होते.
मुंबईमध्ये गुरुवारी होळी तर शुक्रवारी धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र धुळवड साजरा करताना आपापसांत मारामारी, डोळ्यात रंग जाणे, धुळवड खेळताना पडणे अशा विविध कारणांमुळे ३९ जण जखमी झाले आहेत. या जखमींवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहेत. शीव रुग्णालयामध्ये १० जणांन अपघात विभागामध्ये दाखल करण्यात आले. त्यातील दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एक रुग्ण अस्थिव्यंग विभागामध्ये तर दुसऱ्या रुग्णाला शस्त्रक्रिया विभागामध्ये दाखल करण्यात आले आहे. उर्वरित रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली. धुळवड खेळताना डोक्याला मार लागल्याने, डोळ्याला दुखापत झालेले असे १० जण उपचारासाठी अपघात विभागामध्ये दाखल झाले होते. या सर्व रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थितर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी दिली.
त्याचप्रमाणे केईएम रुग्णालयामध्ये सातजण उपचारासाठी दाखल झाले. यातील एका रुग्णाच्या डोळ्याला किरकोळ दुखापत झाली होती, तर अन्य सहा जणांपैकी काहींच्या डोक्याला तर काहींच्या हाता व पायाला दुखापत झाली होती. या सर्वांना उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली. नायर रुग्णालयामध्ये दोन जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश माेहिते यांनी दिली. तसेच होळी खेळताना मारामारी झाल्याने जखमी झालेल्या दोघांना वांद्रे भाभा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. त्यांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती वांद्रे भाभा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद खाडे यांनी सांगितले.
जे. जे. रुग्णालयामध्ये शुक्रवारी दुपारी १ वाजल्यानंतर सहा जण उपचारासाठी दाखल झाले होते. यातील सर्वांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली. त्याचप्रमाणे जी.टी. रुग्णालयामध्ये चार जण उपचारासाठी दाखल झाले. यामध्ये मारामारी झाल्याने एकजण जखमी झाला होता. तर होळी खेळताना दोघांच्या डोक्याला किरकोळ मार लागला होता. या चौघांवर अपघात विभागामध्ये उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जी.टी. रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जीतेंद्र संकपाळ यांनी दिली.
वरळी येथील पोदार आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालयात ११ रुग्ण दाखल झाले. यांना किरकोळ दुखापत झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती पोदार आयुर्वेद रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संपदा संत यांनी दिली.