
मुंबई :
लघवी करताना जळजळणे, लघवी तुंबणे किंवा काही कळायच्या आतच लघवी होणे, मूत्राशयामध्ये संसर्ग होणे, यासारख्या मूत्राशयाशी संदर्भित समस्या मागील काही वर्षांपासून तरुण महिलांमध्ये वाढत आहेत. मागील चार वर्षांमध्ये तब्बल ३ हजार १९० महिलांमध्ये या समस्या आढळून आल्या असून, त्यातील ७०४ महिलांवर मूत्राशय सिंचन ही प्रक्रिया करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे तरुण महिलांचे असल्याचे आढळून आले आहे.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या अखत्यारीतील स्त्री रोग आणि प्रसूतीसाठी प्रख्यात असलेल्या कामा रुग्णालयात २०१९ मध्ये बाह्य रुग्ण विभागात युरोगायनॅक म्हणजेच ओटीपोटाच्या आजारावरील उपचारासाठी स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात आले. अशा पद्धतीचे सरकारी रुग्णालयातील हे पहिले केंद्र आहे. या केंद्रामध्ये उपचार करण्यात येणाऱ्या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात ओटीपोटाचे आजार आढळतात. त्यावर स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा मूत्ररोगतज्ज्ञ उपचार करतात. मात्र, या दोन्ही विषयांतील तज्ज्ञ या विभागामध्ये रुग्णांवर उपचार करतात. कामा रुग्णालयाती यूरोगायनॅक बाह्यरुग्ण विभागांतर्गत २०१९ ते २०२४ या सहा वर्षांत ३ हजार १९० महिलांवर उपचार करण्यात आले आहेत. या महिलांना मूत्राशयासंदर्भात होणाऱ्या आजाराचे व संसर्ग यावर कामा रुग्णालयातील डाॅक्टरांनी अभ्यास केला. या अभ्यासामध्ये दरवर्षी महिलांमध्ये मूत्राशयाशाी संबंधित संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असून यामध्ये तरुण महिलांमध्ये हे प्रमाण अधिक वाढत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
७०४ महिलांवर मूत्राशय सिंचन प्रक्रिया
सहा वर्षांत अभ्यास करण्यात आलेल्या महिलांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त प्रमाण हे तरुण महिलांचे असल्याचे आढळून आले आहे. मूत्राशयामध्ये संसर्गाचे प्रमाण वाढल्याने रुग्णावर मूत्राशय सिंचन ही प्रक्रिया करावी लागते. या प्रक्रियेमध्ये रुग्णाच्या मूत्राशयाला निर्जंतूकीकरण केलेल्या द्रवाने स्वच्छ केले जाते. मागील सहा वर्षांमध्ये उपचार करण्यात आलेल्या ३ हजार १९० महिलांपैकी ७०४ महिलांवर मूत्राशय सिंचन ही प्रक्रिया करण्यात आली असल्याचे कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.
असुरक्षित संभागामुळे प्रमाण वाढतेय
तरुण महिलांमध्ये मूत्राशयामध्ये संसर्ग होण्यामागे विविध कारणे असली तरी असुरक्षित संभोग हे एक महत्त्वाचे कारण आहे. या कारणामुळेच तरुण महिलांमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. दिवसेंदिवस महिलांमधील या समस्यांमध्ये वाढ होताना दिसत असली तरी कामा रुग्णालात सुरू करण्यात ओटीपोटाच्या आजारावरील उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या या स्वतंत्र केंद्रामध्ये म्हणजेच युरोगायनॅक बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्या महिलांना दिलासा मिळत असल्याचेही डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.