शहर

सीडीआर तपासल्यास भाडे तत्वावरील एसटी बसच्या निविदा प्रक्रियेतील हस्तक्षेपाचा छडा लागेल – श्रीरंग बरगे

मुंबई :

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील १,३१० बस गाड्या भाडे तत्त्वावर घेण्याचा निर्णय प्रक्रियेत एका बड्या हस्तीने हस्तक्षेप केल्याचे समजत आहे. या गाड्या खरेदीची निविदा प्रक्रिया अंतिम करण्याच्या वेळी कुणी फोन केले याचे सीडीआर तपासण्यात आले तर या प्रकरणाचा नक्की छडा लागेल, असे मत महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे.

एसटी महामंडळाच्या पातळीवर झालेल्या या निर्णयामुळे भविष्यात एसटीचे अंदाजे १,७०० कोटी रुपयांचे नुकसान झाले असते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतर्कता दाखवून निविदेला स्थगिती दिली व चौकशीचे आदेश दिले. त्याचप्रमाणे निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. हे वास्तव असून या पुढे अशा घटना घडू नयेत यासाठी पारदर्शकता आणली पाहिजे असेही बरगे यांनी म्हटले आहे.

ही निविदा प्रक्रिया राबविताना महत्त्वाच्या पदावर असलेल्या बड्या हस्तीने हस्तक्षेप केला असल्याचे समजत असून आपले कार्यालयीन कामकाज संपवून घरी निघालेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांना परत बोलाविण्यात आले. बळजबरीने जास्त दर देण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडले, अशी माहिती समोर आली आहे. या संदर्भातील फाईलमधील पूर्वीच्या टिप्पण्या पाहिल्या किंवा कॉल रेकॉर्डिंग तपासले तर ‘दूध का दूध व पानी का पानी’ दिसून येईल व नक्की कोण दोषी आहे ते स्पष्ट दिसून येईल. असेही बरगे यांनी म्हटले आहे.

एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठका या शक्यतो मुंबईत घेतल्या जातात. या निविदेला अंतिम स्वरूप देण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन काळात संचालक मंडळाची बैठक तातडीने नागपूर येथे घेण्यात आली. त्यासाठी एसटीच्या काही अधिकाऱ्यांना विमानाने नागपूरला बोलाविण्यात आले. एवढा खर्च व एवढी घाई कुणाला लाभ मिळवून देण्यासाठी करण्यात आली. याचीही चौकशी करण्यात आली पाहिजे, त्याचप्रमाणे एसटीमधील अधिकाऱ्यांनी आपल्या कामात कुचराई केली असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली पाहिजे. त्यासाठी ही चौकशी सरकारी अधिकाऱ्यांमार्फत न करता त्रयस्थ यंत्रनेमार्फत करण्यात यावी, असेही बरगे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *