
चिपळूण :
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे गावात श्री व्याघ्राम्बरी मातेचा त्रैवार्षिक जत्रोत्सव सोहळा ११ व १२ मार्च २०२५ रोजीअत्यंत भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्रातील सुमारे दहा लाख भाविकांसह दुबई, अमेरिका व इतर देशांत कामानिमित्त गेलेले चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाखो भाविकांनी जत्रौत्सवादरम्यान श्री व्याघ्राम्बरी देवीच्या दर्शनाचा लाभ घेऊन, जत्रौत्सवाचा आनंद लुटला. तसेच मुंबई हाफकिनतर्फे यावेळी सर्पदंश झाल्यास काय काळजी घ्यावी याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचा फायदा जत्रोत्सवाला आलेल्या लाखो भाविकांनी घेतला.
या जत्रेमध्ये तिवरे ग्रामस्थांनी महाराष्ट्र शासनाच्या हाफकिन महामंडळाच्या सहकार्याने सर्पांची माहिती, सर्पदंश व त्यावरील प्रभावी उपचार याविषयी माहिती भाविकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्टाॅल लावला होता. या माहितीमध्ये भारतातील व विशेषत: कोकणातील विषारी सापांचे प्रकार व त्यांच्या दंशामुळे शरीरावर होणारे परिणाम, सर्पदंशाची लक्षणे, विषारी व बिनविषारी सर्प कसे ओळखणे, सर्पदंशानंतर करावयाचा प्रथमोपचार, सर्पदंश टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, सापांविषयी जनमानसात असलेल्या शंका आणि अंधश्रद्धा यांचे निरसन केले. तसेच, सर्पदंशाचे औषध मिळण्याकरिता हाफकीन महामंडळातील अधिकारी यांचा संपर्क क्रमांक, इत्यादी माहिती नमूद होती. या माहितीने जत्रेमध्ये आलेल्या भाविकांचे लक्ष वेधले आणि लोकांनी ही माहिती आपल्या मोबाईलमध्ये संग्रहित केली. तसेच सोशल मीडियावर पाठवून इतरत्र मोठ्या प्रमाणावर प्रसारित केली.
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नॅप्स अहवालानुसार दरवर्षी भारतात ४० लाख लोकांना सर्पदंश होतो. त्यातील ५८ हजार लोकांचा उपचाराअभावी मृत्यू होतो. भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करता, ग्रामीण भागांची अवस्था बिकट असल्याने, गावापासून इस्पितळे लांब असल्याने सर्पदंश झालेल्या रुग्णाला घटनास्थळापासून रुग्णालयात नेईपर्यंत बराच वेळ खर्च होतो. यामध्ये रुग्णाचा मृत्यू होतो. अनेक वेळा सर्पदंशामुळे झालेल्या रुग्णांची नोंद होत नाही. विशेषतः कोकणात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर होतात. उपाचाराअभावी रुग्णांचा मृत्यू होतो. मौजे तिवरे ग्रामस्थांनी हाफकीन महामंडळाच्या सहकार्याने त्रैवार्षिक सम्याचे (जत्रौत्सवाचे) औचित्य साधून सर्पदंशाबाबत लोकमानसात केलेली जनजागृती कौतुकास पात्र ठरल्याने भाविकांमध्येही समाधान दिसले. या उपक्रमासाठी तिवरे ता. चिपळूणचे ग्रामस्थ, देवस्थान मंडळ व हाफकीन जीव-औषध निर्माण महामंडळ मर्यादित परेल मुंबईचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अमित डोंगरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.