
मुंबई :
जे.जे. रुग्णालय व ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख व प्रा. डॉ. अजय भंडारवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भंडारवार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तत्कालिन अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची जानेवारीमध्ये सरळसेवेने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हापासून या पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची २२ जानेवारी २०२५ रोजी सरळसेवेने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश येईपर्यंत डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या आदेशानुसार डॉ. पल्लवी सापळे या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या सहसंचालक (वैद्यकीय) या पदावर रुजू झाल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडील जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार संपुष्टात आला आहे. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त कार्यभार जे.जे. रुग्णालयातील शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख व प्राध्यापक डॉ. अजय भंडारवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पुढील आदेश होईपर्यंत हा पदभार त्यांच्याकडे असणार आहे. डॉ. अजय भंडारवार यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील त्यांच्या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या सांभाळून जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा, असे आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने काढले आहेत.