
मुंबई :
मुलुंड डम्पिंग ग्राउंड वरिल हजारो टन कचरा वाहून नेणा-या डंपरमुळे प्रदुषणात वाढ झाली असून स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्व द्रूतगती मार्गावर मातीचा थर जमा झाल्याने डंपर व इतर वाहनांमुळे रस्त्यावरील माती हवेत मिसळत असल्याने दररोज रस्त्यावरुन जाणा-या शाळकरी मुलांना तसेच वयोवृध्दांना तोंडावर रुमाल ठेऊन चालावे लागते. याकडे पालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरीकांनी केला आहे.
मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरुन दररोज सुमारे ४०० डंपर गाड्या कचरा वाहून नेला जात आहे. कचरा डंपरव्दारे मुलुंड पुर्व म्हाडा कॉलनी येथील उड्डान पुलाखालून ठाण्याच्या दिशेने नेला जातो. या वाहतुकीमुळे मुलुंड डम्पिंग ग्राउंड, म्हाडा कॉलनी ते टोल नाका दिड किलोमीटर अंतरावर मातीचा थर जमा होऊन डंपर व इतर गाड्यांमुळे माती हवेत मिसळत आहे. रस्त्यावरुन ये-जा करणा-या नागरीकांना या धुळीचा प्रचंड त्रास होत आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट देताना वाहनांमुळे रस्त्यावर पसरणा-या कच-याची साफसफाई ठेवण्याची जबाबदारीही या कंत्राटदाराला देण्यात आली होती. मात्र कंत्राटदार पालिका अधिका-यांच्या संगनमताने रस्त्यावरील साफसफाई किंवा मातीचा ढिग उचलत नसल्याच्या तक्रारी स्थानिक नागरीकांनी केल्या आहेत. पूर्व द्रूतगती मार्गालगत राहणा-या लोकांना त्याचा सर्वाधिक त्रास होत असून पालिका अधिकारी कंत्राटदारावर का कारवाई करीत नाही असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. शिवाय वाहतूक नियमानुसार अवजड वाहनांमध्ये क्लिनर असणे गरजेचे असताना कंत्राटदाराच्या डंपर मध्ये क्लिनर नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहतूक विभाग व पालिका अधिकारी लोकांच्या जीवाशी खेळत असून त्यांना कंत्राटदाराचे हित महत्त्वाचे वाटत आहे.
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ६ वर्षांचे कंत्राट
मुंबईतील चार डम्पिंग ग्राउंडपैकी मुलुंड व गोराई डम्पिंग ग्राउड बंद करण्यात आले आहेत. मुलुंड डम्पिंग ग्राउंडची कचरा साठवण क्षमता ७० लाख मेट्रिक टन आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावण्याचे काम सहा वर्षासाठी कंत्राटदाराला देण्यात आले आहे. करोना काळात मुदतवाढ देण्यात आल्या नंतर जून २०२५ पर्यंत या कचऱ्याची विल्हेवाट लावायची आहे. त्यासाठी पालिकेने ५५८ कोटी रुपयांचा करारही केला आहे.
जून २०२५ पर्यंत उद्दिष्ट अशक्य
आतापर्यंत अंदाजे ३५ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी किमान १२ लाख मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे उद्दिष्ट असताना ही ते काम पुर्ण झालेले नाही. त्यामुळे कंत्राटदाराला पालिकेने ८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र कामाची गती पाहता जून २०२५ पर्यंत कचरा विल्हेवाट लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
ईशान्य मुंबईत मुलुंड, कांजुरमार्ग व देवनार असे ३ डम्पिंग ग्राउंड असल्याने आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत. शिवाय प्रदूषणात ही मोठी वाढ होत असल्याने याबाबत संसदेत मी हा प्रश्न उपस्थित केला होता. मुलुंड डम्पिंग ग्राउंडचा कचरा गेल्या सहा वर्षांपासून उचलण्याचे काम चालू आहे. त्यामुळे मुलुंडमध्ये प्रदूषणात वाढ झाली असून मुंबई पालिका आयुक्त भूषण गगरानी, ‘टी’ विभाग अधिकारी तसेच कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी. नागरीकांच्या जीवाशी खेळायचे प्रकार पालिका प्रशासनाने तात्काळ थांबवावे. अन्यथा पालिका विरोधात जनआंदोलन करावे लागेल.
– संजय दिना पाटील, खासदार, ईशान्य मुंबई, महाविकास आघाडी