मनोरंजन

सत्य आणि अन्यायाच्या संघर्षात कोण जिंकेल? ‘राख’ चा जबरदस्त ट्रेलर लाँच

मुंबई : 

मराठी ओटीटी विश्वात दमदार आणि प्रभावी कथा घेऊन येण्याचा अल्ट्रा झकासचा प्रयत्न सुरूच आहे. आता त्यांनी आणखी एक रोमांचक वेब सिरीज सादर करण्याची तयारी केली आहे – ‘राख’! ही वेब सिरीज केवळ गुन्हेगारी आणि पोलिस तपासावर आधारित नसून, सत्याच्या शोधात एका पोलिस अधिकाऱ्याच्या प्रवासाची आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर पडणाऱ्या परिणामांची एक उत्कंठावर्धक कथा आहे. तसेच ही वेब सिरीज २१ मार्चला अल्ट्रा झकासवर येणार असून, आज १७ मार्चला सोशल मीडियावर ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

अत्याधुनिक कथा, दमदार सादरीकरण!

सामाजिक अन्याय, राजकीय कटकारस्थानं आणि पोलिस दलातील संघर्ष यासारख्या विषयांवर आधारित ‘राख’ ही वेब सिरीज ७ भागांमध्ये प्रेक्षकांसमोर सादर केली जाणार आहे. एका निडर पोलिस अधिकाऱ्याची सत्याच्या शोधात चाललेली धडपड, त्याला मिळणारे खरे-खोटे संकेत, आणि या संपूर्ण प्रवासात त्याच्याच भोवती विळखा घालणारी एक अंधारी आणि धक्कादायक दुनिया—हे सगळं अनुभवायला मिळणार आहे. प्रत्येक भाग नवीन रहस्य उलगडत जाईल आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.

दिग्दर्शक आणि कलाकारांची जबरदस्त जोडी

या वेब सिरीजचं दिग्दर्शन अनुभवी दिग्दर्शक राजू देसाई आणि विशाल देसाई यांनी केलं असून, त्यांच्या दिग्दर्शनशैलीत वास्तववाद, सस्पेन्स आणि थरार याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोबतच निर्मितीची जबाबदारी सुशीलकुमार अग्रवाल यांनी देखील समर्थपणे सांभाळली आहे, ज्यांनी अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेंटच्या माध्यमातून अनेक दर्जेदार प्रकल्प साकारले आहेत. कलाकारांचा तगडा संचही ‘राख’ चं मोठं आकर्षण आहे. यात अजिंक्य राऊत, गौरी नलावडे, रोहित कोकाटे, मिलिंद शिंदे, मिलिंद दस्ताने, चैतन्य देशपांडे, ऋतुराज शिंदे, नेहा बाम, विनायक चव्हाण आणि कृष्ण रघुवंशी यांसारखे ताकदीचे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे ही वेब सिरीज आणखी उत्कंठावर्धक ठरणार आहे.

थरारक कथा, उत्कंठा वाढवणारा अनुभव

‘राख’ ही केवळ एक गुन्हेगारी कथा नाही, तर ती सत्य आणि न्यायासाठी झगडणाऱ्या माणसाची कहाणी आहे. इन्स्पेक्टर अभय अरविंद जाधव हा एक निडर आणि प्रामाणिक पोलिस अधिकारी दाखवला आहे, जो कोणत्याही दबावाला झुकत नाही. परंतु, जेव्हा त्याच्या जवळच्या मित्राचा खून होतो, तेव्हा त्याची न्याय मिळवून देण्याची लढाई आणखी तीव्र होते. या गुन्ह्यामागे मोठे षड्यंत्र असल्याचे स्पष्ट होत जाते, आणि सत्याच्या शोधात अभयला मोठ्या राजकीय व गुन्हेगारी शक्तींशी सामना करावा लागतो. कायदा सर्वांसाठी सारखाच आहे का? भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या निडर माणसाचं आयुष्य किती कठीण असतं? आणि, खरंच न्याय मिळतो का?

सस्पेन्स, क्राईम आणि थरारप्रेमींसाठी परफेक्ट हब

अल्ट्रा झकास मराठी प्रेक्षकांसाठी नेहमीच काहीतरी नवीन आणि वेगळं आणण्याचा प्रयत्न करत असतं. विशेषतः पोलिस तपासणी, गुन्हेगारी आणि भ्रष्ट व्यवस्था यावर आधारित कथा सादर करण्याच्या बाबतीत अल्ट्रा झकास एक परिपूर्ण प्लॅटफॉर्म ठरत आहे. ‘राख’ ही त्याच दिशेने एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे.

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “मराठी प्रेक्षकांसाठी आम्ही नेहमीच दर्जेदार आणि वेगळ्या धाटणीचं मनोरंजन आणण्याचा प्रयत्न करतो.”‘राख’सारखी वेब सिरीज फक्त एक कथा नाही, तर सस्पेन्स, थरार आणि रोमांचक प्रवासाने भरलेला अनुभव आहे. यासोबत, आम्ही मराठी चित्रपट आणि वेब सिरीजच्या माध्यमातून मनोरंजनासह सामाजिक भान जपण्याचा देखील प्रयत्न करत असतो आणि आमचं उद्दिष्ट नेहमीच प्रेक्षकांना दर्जेदार आणि कुटुंबासोबत पाहण्याजोगं मनोरंजन देण्याचे आहे.”

कुठे पाहाल?

मराठी सिनेप्रेमी आणि वेब सिरीजप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे! ‘राख’ २१ मार्चपासून फक्त अल्ट्रा झकास या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. गुन्हेगारी जगताचा अंधार उलगडणारी, निडर पोलिस अधिकाऱ्याच्या संघर्षाची आणि सत्याच्या शोधातील एका जबरदस्त प्रवासाची ही कथा पाहायला विसरू नका!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *