गुन्हे

बदलापूर येथे बीआयएसकडून ज्वेलरी दुकानावर छापा; २१ लाखांचे सोने जप्त 

बदलापूर : 

भारतीय मानक ब्युरो (BIS), मुंबई शाखा कार्यालय – II ने १९ मार्च २०२५ रोजी ठाणे जिल्ह्यात शोध व जप्ती मोहीम राबवली. या मोहीमेमध्ये २५१.३९० ग्रॅम बनावट सोन्याचे दागिने जप्त केले. बदलापूर पूर्व, ठाणे येथील एम/एस जय भवानी ज्वेलर्स या आस्थापनावर शोध व जप्ती मोहिमेदरम्यान २५१.३९० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. या दागिन्यांवर बोगस हॉलमार्क चिन्ह, बीआयएस लोगो होते, पण हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन डिजिट (HUID) नव्हते. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे २१ लाख रुपयांहून अधिक आहे.

गॅझेट अधिसूचना आदेश क्र. १०४७(ई) दिनांक ३ मार्च २०२३ नुसार, सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग (सुधारणात्मक) आदेश, २०२३० अंतर्गत, कोणताही ज्वेलर्स ३१ मार्च २०२३ नंतर वैध HUID मार्कशिवाय सोने विकू शकत नाही. भारतीय मानक ब्युरो अधिनियम, २०१६ नुसार, वरील ज्वेलर्सवर फौजदारी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाईल. या कायद्यानुसार, एक वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा किमान एक लाख रुपये दंड, तसेच विक्रीसाठी ठेवलेल्या किंवा विकलेल्या वस्तूंच्या किमतीच्या पाच पट दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

बनावट वस्तूंचे उत्पादन व विक्री रोखण्यासाठी आणि ग्राहकांची दिशाभूल होऊ नये म्हणून, भारतीय मानक ब्युरो सातत्याने छापे आणि शोध मोहीमा राबवत आहे. ग्राहकांनी कोणतेही उत्पादने खरेदी करण्यापूर्वी BIS Care App द्वारे परवाना स्थिती पडताळून पाहावी. जर तो निलंबित/रद्द/कालबाह्य आढळल्यास, ग्राहकांनी तक्रार नोंदवावी. बीआयएस मानक चिन्हांचा ( ISI मार्क, बीआयएस नोंदणी चिन्ह, बीआयएस हॉलमार्क 22K916 XXXXXX, बीआयएस व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र ) गैरवापर झाल्यास, ईमेल, पत्र किंवा BIS CARE अ‍ॅपद्वारे तक्रार नोंदवू शकतात. तक्रारदाराची माहिती गोपनीय ठेवली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *